एक हजाराची लाच : खादी व ग्रामोद्योग यवतमाळ : सुशिक्षीत बेरोजगाराचा कर्ज प्रस्ताव बँकेत पाठविण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या प्रभारी सहाय्यक जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा शुक्रवारी ठोठावली. मिलिंद मारोतराव भवरे (५०) असे शिक्षा झालेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. भवरे हे खादी ग्राम उद्योग विभागात ज्येष्ठ पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे सहायक जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी पदाचा प्रभार होता. फर्निचरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गजानन सवाई या बेरोजगार युवकाने एक लाख रुपये कर्जाचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यासाठी भवरे यांनी एक हजार रुपयाची लाच मागितली. याची तक्रार गजाननने लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधिक्षक ए.डी. जाहारवार यांचेकडे केली. त्यावरून १४ जानेवारी २०१० रोजी सापळा रूचुन मिलींद भवरे यांना खादी ग्राम उद्योग कार्यालयासमोर लाच स्विकारताना अटक करण्यात आली. या प्रकरणात विशेष न्यायाधीश अरविंद वाघमारे यांनी सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तर बचाव पक्षाकडून एक साक्षीदार तपासला. गुन्हा सिद्ध झाल्याने मिलींद भवरे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंड ठोठावला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील नितीनचंद्र नथवाणी यांनी युक्तीवाद केला. (कार्यालय प्रतिनिधी)
लाचखोर अधिकाऱ्याला दोन वर्षे कैदेची शिक्षा
By admin | Published: August 20, 2016 12:06 AM