लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील तालुका उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभाराने सर्वच जण त्रस्त होते. पैसे देऊनही काम वेळेत केले जात नव्हते. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एसीबीच्या पथकाने उपअधीक्षकाला कक्षातच १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरात पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
विजय लालसिंग राठोड (५५) असे अटक करण्यात आलेल्या उपअधीक्षकाचे नाव आहे. अमरावती एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. एसीबीच्या समक्षच कार्यालयात आरोपी राठोड याने १० हजारांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली. चौकशीसाठी आरोपीला विश्रामगृहावर नेण्यात आले. या प्रकरणात गुन्हा नोंद झालेला नाही. एसीबीने कारवाईनंतर पुढील चौकशी सुरू केली आहे. आरोपी विजय राठोड याने तक्रारदाराच्या जावयाचे नाव मिळकत पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी (फेरफार घेण्यासाठी) लाचेची मागणी केली होती. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचून कारवाई केली.