अखिलेशकुमार सिंह : सण-उत्सवातील शांततेसाठी उपाययोजना सुरू यवतमाळ : आगामी पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव शांततेत पार पडावे म्हणून पोलिसांनी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. त्याअंतर्गत समाजात धोकादायक वाटणाऱ्या, क्रियाशील गुंडांना तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिले आहेत. शनिवारी जिल्हाभरातील उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदारांची महत्वपूर्ण क्राईम मिटींग मुख्यालयात पार पडली. यावेळी अखिलेशकुमार सिंह यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. आगामी सण-उत्सव या विषयावर सखोल चर्चा झाली. संवेदनशील ठिकाणे, तेथील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटनांचा इतिहास यावर चर्चा केली गेली. गणेशोत्सव, दुर्गोत्सव शांततेत पार पडावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे व खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. जातीय दंगली, दोन समाजातील हाणामारी, विटंबना या सारख्या प्रकरणात रेकॉर्डवर असलेल्या तसेच समाजासाठी त्रासदायक ठरणाऱ्या गुंडांची हिस्ट्रीशिट तपासून त्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. पोळा कुठे-कुठे भरतो, तेथील घटनांचे इतिहास यावरही नजर टाकण्यात आली. क्रियाशील गुन्हेगारांना रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमांद्वारे प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या. बैठकीच्या दुसऱ्या सत्रात पाहिजे-फरारी आरोपींची वाढती संख्या, समन्स-वॉरंट, न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविणे या विषयांवर एसपींनी आढावा घेतला. शिक्षेचा दर वाढावा यासाठी दोषारोपपत्रात कोणत्याही त्रुट्या राहणार नाही याची खबरदारी घेतानाच पैरवी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी, असे निर्देश अखिलेशकुमार सिंह यांनी दिले. या बैठकीत वाढत्या चोऱ्या-घरफोड्या, डिटेक्शनचे न वाढणारे प्रमाण याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. दारू-जुगार, अवैध प्रवासी वाहतूक बंद करा असे सूतोवाच एसपींनी पुन्हा एकदा या बैठकीत केले. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यातील क्रियाशील गुंडांना तडीपार करा
By admin | Published: August 09, 2015 12:02 AM