यवतमाळ : शहरालगतच्या पांढरकवडा मार्गावरील तळेगाव येथे एका टेकडीवर झोपडी बांधून राहणाऱ्या वृद्धांची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. टेकडीवर झोपडीवजा घरात राहून येथील ९२ वर्षीय वृद्ध आयुर्वेदिक औषधी देत होते. त्यांच्या मदतीला ७० वर्षीय महिला होती. या दोघांचाही मृतदेह सकाळी आढळून आला.
लक्ष्मण चंपतराव शेंडे (९२), पुष्पा बापूराव होले (७०) अशी मृतांची नावे आहे. लक्ष्मण शेंडे हे तेथे राहून अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक औषधीचे वितरण करीत होते. मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे येत. हाडांच्या दुखण्यासाठी लेप व इतर औषधीही देत होते. यामुळे शेंडे राहात असलेला परिसर सज्जनगड म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी छोटे मंदिरही बांधण्यात आले आहे. शेंडे यांनी परिसराची साफसफाई करण्यासाठी गावातीलच एका युवकाला कामाला ठेवल्याने मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे युवक परिसर साफसफाईसाठी आला. त्याने सफाई केल्यानंतरही दोघेही वृद्ध झोपूनच होते. त्याने आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर संशय आल्याने त्या युवकाने ही बाब तळेगाव येथे जावून ग्रामस्थांना सांगितली. त्यावरून घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसाचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्या परिसराची पाहणी केली असता, चोरीच्या उद्देशाने दोन्ही वृद्धांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला मृतांच्या अंगावर कुठेही मारहाणीच्या जखमा किंवा गळा दबल्याचे व्रण आढळून आले नाही. त्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबतही शंका निर्माण झाली होती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पंचनामा करत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. त्यामध्ये दोघांनाही मार लागल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. वृद्धाच्या छातीवर मार आहे, तर डोक्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास हातात घेतला असून, नेमकी कोणत्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली याचा शोध घेतला जात आहे.
घटनास्थळी श्वान पथकाला केले पाचारण
ज्या झोपडीत वृद्धांची हत्या झाली तेथे काही सुगावा मिळतो का यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानांना येथे कुठलाही सुगावा मिळाला नाही. घटना गंभीर असल्याने अपर पोलिस अधीक्षक पीयुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुनकलवार, एलसीबीचे प्रमुख आधारसिंग सोनोने घटनास्थळी पोहोचले. एलसीबीच्या पथकानेही या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे.