लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अनैतिक संबंधातून टॅक्सी चालकाने आपल्या प्रेयसीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची खळबळनजक घटना शुक्रवारी वणी तालुक्यातील नांदेपेरा रोडवर वांजरी शेतशिवारात उघडकीस आली. जया मनोज आवारी (३२) रा. वडोदा ता. वरोरा असे मृताचे नाव आहे. ती वणीतील पटवारी काॅलनीत दोन मुलांसह किरायाने राहत होती. ती मूळची वणी तालुक्याच्या पिंपळगाव येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता वांजरी येथील बडवाईक यांचा सालगडी गोठ्यातून बैल काढत असताना त्याला जयाचा मृतदेहच आढळून आला. याबाबत माहिती मिळताच वणीचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, फौजदार माया चाटसे, एकाडे यांचे पथक व एसडीपीओ संजय पुज्जलवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी मृताच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. वणीचे ठाणेदार वैभव जाधव नागपूरला असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी या खुनाच्या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तातडीने तपासचक्रे फिरवून आरोपी प्रियकर संजय सालवटकर (४५) रा. साखरा ता. वरोरा जि. चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाचे प्रात्यक्षिक पोलिसांना करून दाखविले. खुनासाठी वापरलेला लोखंडी राॅडही आरोपीने सांगितलेल्या जागेवरून जप्त करण्यात आला. या आरोपीच्या अटकेसाठी वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांची मदत घेण्यात आली. मुलाला शाळेत नेताना जुळले सूत पोलीस सूत्रानुसार, जयाचा विवाह वडोदा येथे झाल्याने ती सहा वर्षांपासून तिथे रहायची. आरोपी टॅक्सी चालक संजय सालवटकर हा जयाच्या मुलांना शेगाव येथे शाळेत नेण्या-आणण्याचे काम करीत होता. या दरम्यान त्यांच्यात प्रेमसूत जुळले. जयाने केला संजयचा नंबर ब्लाॅकपतीला संशय आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाले. त्यातूनच ती वर्षाभरापासून वणी येथे किरायाने राहत होती. तिचा संजय सोबत संपर्क सुरूच होता. तो प्रतिसाद देत नसल्याने तिने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लाॅक केला होता. गुरुवारी रात्री ते दोघे पुन्हा वणीत भेटले. त्यानंतर नांदेपेरा रोडवर खुनाची ही घटना घडल्याचे सांगितले जाते. घरुन गेलेली जया परतलीच नाही गुरुवारी रात्री ती मामाकडे जातो म्हणून घरुन गेली. मात्र बराच वेळ होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. हा शोध सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी नांदेपेरा रोडवर मृतदेह आढळला. हा मृतदेह जयाचाच असल्याची ओळख तिच्या कुटुंबीयांनी पटविली. एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
वणी पोलिसांना दोन दिवसांपूर्वी फोन वणी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा फोन आला, तिने आपले नाव सांगितले नाही, मात्र मला बलात्काराची तक्रार द्यायची आहे, असे तिने म्हटले. त्यावर तिला प्रत्यक्ष ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र ती आली नाही. हा फोन जयाचाच असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.