यवतमाळ : पुसद येथील ३३ केव्ही तलाव सबस्टेशनमागे कृष्णाक्रांतीनगर येथे रिकाम्या प्लॉटिंगमध्ये एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
सय्यद मोबिनोद्दीन खतीब (वय ३२, रा. वसंतनगर परिसर) असे मृताचे नाव आहे. मयतीवरून सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तो पुसदला परतला. श्रीरामपूर येथील एका हॉटेलमधून चिकन व एका बारमधून त्याने मद्य घेतले. नंतर वालतूर नाल्याच्या बाजूला गजानन डुबेवार यांच्या ले-आऊटमध्ये रस्त्यावर तो दारू पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मित्र होता. अचानक शेख मुख्तार (मुलतानी) शेख निजाम गवतातून बाहेर आला. त्याच्यासोबत इतर चार व्यक्ती होत्या. त्यांनी सय्यद मोबिनोद्दीनवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यामुळे सय्यद मोबिनोद्दीन सोबत असलेला मित्र पळून गेला.
शेख सलमान शेख बाबू याने सय्यद मोबिनोद्दीनचा भाऊ समीउद्दीन यांना फोन करून लवकर वालतूर नाल्यावर या असे सांगितले. नंतर सय्यद मोमीनोद्दीन सय्यद इलयासोद्दीन खतीब (३४) व समीउद्दीन रविवारी रात्रीच जेवणाच्या ताटावरून उठून घटनास्थळी पोहोचले. तेथे शेख सलमान घाबरलेल्या अवस्थेत आढळला. त्याला मृताच्या भावांनी छोटू कुठे आहे म्हणून विचारणा केली. त्याने रडतच सर्व घटनाक्रम सांगितला.
त्यानंतर सर्वांनी सय्यद मोबिनोद्दीनचा मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला. त्यानंतर मृतक लगतच्या नालीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्याच्या पोटातील आतडी बाहेर आली होती. डोक्यावर व हातावर कापलेले होते. तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. तो जागीच मृत झाला होता. त्यानंतर मृताच्या भावांनी वसंतनगर पोलिसांना माहिती दिली. वसंतनगरचे ठाणेदार प्रवीण नाचनकर व शहरचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
ही घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका खासगी हॉस्पिटलमागे वालतूर नाल्याच्या बाजूला गजानन डुबेवार यांच्या ले-आऊटमध्ये घडली. या प्रकरणी मृताचा भाऊ सय्यद मोमिनोद्दीन सय्यद इलयासोद्दीन खतीब यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख मुख्तार (मुलतानी) शेख निजाम (रा. मोमीनपुरा), शेख पप्पू शेख निजाम (रा. मोमीनपुरा), शेख आसीफ शेख शम्मी ( रा. मुलतानवाडी) व इतर चारजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यापैकी दोघांना अटक केल्याचे वसंतनगर पोलिसांनी सांगितले.
चार महिन्यांपूर्वीच दिली हिंट
चार महिन्यांपूर्वी शेख मुख्तार हा सय्यद मोमिनोद्दीन यांच्या हॉटेलवर गेला होता. त्याने मोमिनोद्दीनला पानटपरीवर बोलावून ‘तेरा भाई मेरे भांजेको मारनेवालो के साथ मे रहा है, उनको साथ लेके घुमता है, उनके उपर खर्चा करता है, ये अच्छा नही, तुम्हारे छोटे को समझा दो, नही तो मै उसको उडा दुंगा’ अशा इशारा दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मृत छोटू याच्यासोबत राहणारे साहील आणि सल्ल्या ऊर्फ सलमान यांनी मुख्तारचा भाचा अलीम याला पाच महिन्यांपूर्वी वाशिम रोडवर मारहाण केली होती. त्या रागातूनच हा खून करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.