रुपेश उत्तरवार
यवतमाळ : गावच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहते. त्यामुळेच शासन ग्रामपंचायतींना विविध अधिकार देऊन विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी देत आहे; मात्र जिल्ह्यातील तब्बल १०० ग्रामपंचायतींचा कारभार नादुरुस्त इमारतीमधून सुरू आहे. तर ३३८ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नसल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाने गावे स्वयंपूर्ण व्हावीत यावर भर दिला आहे. गावांच्या विकासकामांसाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधीही दिला जात आहे; मात्र ज्या ठिकाणाहून हा सर्व कारभार चालतो, तेथील पदाधिकारी, कर्मचारीच सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सुमारे १०० वर ग्रामपंचायतींची अवस्था अत्यंत बिकट आहे; मात्र तरीही ग्रामसेवक तसेच इतर कर्मचारी या धोकादायक ठिकाणी बसूनच गावाचा कारभार हाकत आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींमध्ये वर्षाचे १२ ही महिने ग्रामस्थांची विविध कामांसाठी गर्दी असते. एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मागील वर्षी जनसुविधा तसेच आमदार आणि खासदार निधीतून जिल्ह्यातील १६ ठिकाणी ग्रामपंचायत भवनची उभारणी झाली असली तरी नादुरुस्त असलेल्या १०० ग्रामपंचायतींच्या दुरुस्तीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. २०१८-१९ या वर्षात स्व. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत योजनेतून बांधकामासाठी २४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; मात्र तीन वर्षे उलटली तरी या ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झालेला नाही.
इमारत कोसळण्याची वाटते भीती
ग्रामपंचायतीची इमारत मोडकळीस आली आहे. ही जीर्ण स्वरूपातील इमारत कधी कोसळेल याची भीती वाटते. यामुळे आम्ही ग्रामपंचायतीचे दार उघडत नाही. या ठिकाणचे रेकॉर्ड शाळेच्या खोलीत हलविले आहे. बैठक शाळेच्या खोलीत घेतली जाते. ग्रामसभा समाज भवनात घ्यावी लागते. - मारोती सुनील गेजीक, सरपंच बोथबोडन
ग्रामसभा होते खुल्या मैदानात
ग्रामपंचायत इमारत नाही. गावातील गजानन महाराजाच्या मंदिराजवळ असलेल्या खोलीत कार्यालय चालविले जाते. ग्रामसभा घ्यायची असेल तर खुल्या मैदानात घ्यावी लागते. चार-पाच महिन्यांआधी यासाठी प्रस्ताव पाठविले होते. अजूनही मंजुरी मिळाली नाही.
- शीतल कुरटकर, उपसरपंच, कोठोडा
मारुती मंदिराच्या हॉलमध्ये ग्रामसभा
ग्रामपंचायतीची जुनी इमारत अपुरी आहे. या ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव दिला आहे. या ठिकाणी सदस्य बसू शकतात; मात्र ग्रामसभा घ्यायची म्हटली तर मारुती मंदिराच्या हॉलमध्येच सभा घ्यावी लागते.
- पूजा खोडे, सरपंच, सातेफळ
अजून प्रस्तावाला मंजुरी नाही
राजीव गांधी ग्रामपंचायत भवनासाठी नरेगामधून प्रस्ताव पाठविण्यात आला; मात्र याला मंजुरी मिळाली नाही. जुन्या इमारतीमध्ये कार्यालय आहे. बैठक घ्यायची म्हटले तर गावातील बिरसामुंडा हॉलमध्ये सभा घ्यावी लागते.
- सोनाली पुरुषोत्तम टिचुकले, सरपंच, जांब