लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बुलडाणा जिल्हा पोलीस दलात नियंत्रण कक्षात कार्यरत पंकज नामक पोलीस शिपाई यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील तमाम डिटेक्शन ब्रँचवर भारी पडल्याचे दिसून येते. पंकजच्याच टीपवरून स्थानिक पोलीस धाडी घालत असून तो स्वत: धाडीतही सहभागी होत असल्याचे सिद्ध झाले. तीन दिवसांपूर्वी सायबर सेल आणि दामिनी पथकाने स्थानिक आठवडी बाजारातील राम शर्मा याच्या डिजिटल क्रिकेट सट्ट्यावर धाड घातली. तेथून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषद घेऊन या धाडीची माहिती दिली. यावेळी झालेल्या फोटो सेशनमध्ये एक अनोळखी चेहरा पोलिसांमध्ये आढळून आला. पत्रकारांनी स्थानिक पोलिसांकडे हा व्यक्ती नेमका अधिकारी कोण, याची विचारणा केली असता बुलडाण्यातील पंकजच्या एकूणच ‘कामगिरी’चे बिंग फुटले. पोलीस वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार पंकज बुलडाणा सीआरओला कार्यरत असून, आधीपासूनच साहेबांच्या गुडबूकमध्ये आहे. तो अनेकदा येथे येतो. सायबरमधील माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांना येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांची टीप देतो. त्या आधारे धाडी घालून त्या यशस्वीही केल्या जातात. यावरून एकटा पंकज येथील क्राईम ब्रँच व डिटेक्शनची जबाबदारी असलेल्या अनेक पथकांवर भारी पडल्याचेही मानले जाते. गुरुवारीही दुपारी पंकज साहेबांच्या केबिनसमोर झळकल्याने त्या धाडीपासून त्याचा मुक्काम येथेच असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळातील कामगिरीसाठी पंकज अधिकृतरित्या बुलडाणा येथे सुट्या टाकून येतो की ‘गुडफेथ’मध्ये रवानगी टाकून, हे मात्र स्पष्ट झाले नाही. पंकजकडून दिल्या जाणाऱ्या टीप व यशस्वी होणाऱ्या धाडींमुळे स्थानिक पोलिसांमध्ये मात्र काहिसे अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळते. मात्र, साहेबांच्या गुडबूकमध्ये असल्याने कुणाला काही बोलण्याची सोय नसल्याची अडचणही या कर्मचाऱ्यांकडून मान्य केली जात आहे. पंकजची बुलडाणा जिल्ह्यातून येऊन येथे सुरू असलेली ‘कामगिरी’ स्थानिक पोलिसांना आत्मचिंतन करायला लावणारी ठरली आहे.
२० लाख गमावलेल्या शिपायाची तर टीप नव्हे? आयपीएल क्रिकेट सट्ट्यात उमरखेड उपविभागात कार्यरत एका पोलीस शिपायाने २० लाख रुपये गमावले. या रकमेची भरपाई त्याला दागदागिने मोडून करून द्यावी लागली. त्याचा वचपा काढण्यासाठी तर त्या पोलीस शिपायाने बुलडाण्याच्या पंकजमार्फत आठवडी बाजारातील डिजिटल क्रिकेट सट्ट्याची टीप दिली नसावी ना, अशी शंका पाेलीस वर्तुळातूनच व्यक्त केली जात आहे. तो पोलीस शिपाई एकेकाळी यवतमाळातील गाजलेल्या ‘९२ डीबी’चा सदस्य राहिलेला आहे. पोलीस खात्यातील अशाच काही महाभागांचे यवतमाळच्या गुन्हेगारीत सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. ते तोडल्याशिवाय येथील गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे रॅकेट पूर्णत: नियंत्रणात येणार नाही, एवढे निश्चित.