यवतमाळ : पशुधनावरील लम्पी स्किन डिसिजचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या राेगाने आतापर्यंत २३ हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यभरातील बैलबाजार रोखण्यात आले आहेत, तर दुसरीकडे दुधाचे उत्पादनात घट येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. विदर्भातील बहुतांश सर्व जिल्ह्यांतील कामे बैलावरच होतात. आता बैलच आजारी पडल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
शेतीचा संपूर्ण डोलारा पशुधनावर अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील शेतीची संपूर्ण कामे बैलजोडीनेच केली जातात. आता हे पशुधनच लम्पीच्या विळख्यात सापडले आहे. यातून शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. राज्यात ३ लाख ५६ हजार पशुधनाला लम्पीची लागण झाली होती. यातील दोन लाख ५५ हजार ३५५ पशुधन बरे झाले. यातील २३ हजार ९६ पशूंचा लम्पीने मृत्यू झाला आहे.
एकीकडे यांत्रिकीकरणामुळे पशूंची संख्या रोडावत आहे. यासोबतच लम्पी रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पशूंनी ही संख्या घटविली आहे. यातून शेती क्षेत्रातील कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
बैलवर्गीय आणि गायवर्गीय जनावरांची संख्या लम्पीमुळे बाधित झाली आहे. या रोगात अनेक गायींच्या डोळ्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक बैल आजारी पडल्याने शेतीची कामे थांबली आहेत. जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवत आहे. गायीच्या दुधाचे प्रमाणही यातून प्रभावित झालेे आहे. याचा फटका दूध उत्पादनाला बसण्याचा धोका वर्तविला जात आहे. राज्यातील पशुपालकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. जनावरांच्या मृत्यूने आर्थिक नुकसानही झाले आहे.
दरवर्षी काही पशुपालक पशुधनाची विक्री करतात आणि त्याच्या उलाढालीतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. आता बैलबाजार थांबल्याने या व्यवसायावर विसंबून असणारे अडचणीत आले आहेत. बैलबाजारावरील बंदी हटण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात चिंता वाढली
विदर्भातील शेती व्यवसाय पशुधनावर अवलंबून आहे. प्रत्येक कामासाठी बैलजोडीच वापरली जाते. पशुधनाच्या आजारापणाने शेतीची कामे करावी कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शेतशिवारातील मशागतीचे कामे थांबली आहेत. त्याला पर्याय असलेले छोटे ट्रॅक्टर उपलब्ध नाही. याशिवाय जनावरांच्या मृत्यूने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.