यवतमाळ : शहरालगतच्या डोर्ली येथे खुल्या मैदानात झाडावर टीव्ही बांधून क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात होता. याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. एलसीबीच्या पथकाने चालू मॅचदरम्यान सट्टा खायवाडी करणाऱ्या चौघांना रंगेहाथ अटक केली. यात सट्ट्यातील कुख्यात बंटी व गब्बर यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख १२ हजार ४७०, मोबाइल फोन, दुचाकी असा ८४ हजार ४९० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
शहरासह जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे. एलसीबीच्या पथकाने वणी येथे क्रिकेट बुकींवर धाड टाकून त्यांना अटक केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला डोर्ली येथे नीलेश पिपरानी याच्या शेतात सट्टा खायवाड केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध धाड टाकली.
त्या ठिकाणी नंदलाल उर्फ बंटी गयाप्रसाद जयस्वाल (३५, रा. बोदड), शेख रहीम उर्फ गब्बर शेख जमाल (४७, रा. तारपुरा) हे राजस्थान रॉयल व दिल्ली कॅपिटल या क्रिकेट संघाच्या सामन्यावर मोबाइल फोनद्वारे जीबी एक्सचेंज नावाने आयडी तयार करून क्रिकेट सट्ट्याचे पैसे घेत होते. त्यांच्या सोबत गजानन लखनलाल यादव (४२, रा. तापपुरा) हाही येथे होता. या तिघांना जाग्यावरूनच अटक केली.
तर या गुन्ह्यात नीलेश पिपरानी हा पसार झाला. चारही आरोपींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व सहकलम १०९ भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच या धंद्यामध्ये सहभागी असलेल्या इतरही काही जणांवर पोलिसांनी कारवाई प्रस्तावित केली आहे. ही कारवाई परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक विनायक कोथे, दिनेश बैसाने, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात जमादार साजीद सैयद, बंडू डांगे, अजय डोळे, रूपेश पाली, विनोद राठोड, रितूराज मेडवे, धनंजय श्रीरामे यांनी केली.