यवतमाळ : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका तलावातच काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे नगरपरिषदेसह तहसील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरातील धोबी घाट, भारतनगर, तलावफैल आणि पावर हाऊस या परिसराच्या मधोमध तलाव आहे. या तलावातील पाणी नागरिक दैनंदिन कामासाठी उपयोगी आणतात. धोबी बांधव याच तलावाच्या पात्रात कपडे धुवून कुटुंबाचा गाडा ओढतात. एवढेच नव्हे तर गवळीपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत. जनावरांना पिण्यासाठी या तलावातील पाण्याचाच वापर होतो. असे असताना काही व्यावसायिकांनी या तलावातच वीटभट्ट्या लावण्याचा सपाटा चालविला आहे. तलावातील काळ्या मातीचा उपसा करून तो विट तयार करण्यासाठी वापरला जातो. शिवाय परिसरातील झाडांचे लाकूड तोडून वीटभट्ट्यांसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद आणि तहसील प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने आर्थिक हितसंबंधातून या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांची मजल दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता तर त्यांनी तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही केले आहे. या संदर्भात नुकतेच स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन दिले. तसेच अतिक्रमण आणि वीटभट्ट्या तेथून हटविण्याची मागणी केली. निवेदन देतेवेळी सुधाकर घायघोडे, सटरा पोहे, नारायण अजमिरे, सुजीत मोरवाल, अजय मारशेट्टीवार, शंकर वैरागडे, सुभाष गौरखेड उपस्थित होते.
तलावातच सुरू केल्या वीटभट्ट्या
By admin | Published: November 01, 2014 11:15 PM