यवतमाळ : एकीकडे एसटी बस खचाखच भरून जात असताना, दुसरीकडे एकही प्रवासी नसलेल्या बसेस धावत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. प्रवासी मिळत नसताना केवळ किलोमीटर पूर्ण करण्याच्या अट्टाहासापोटी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहेत. काही ठिकाणी फेऱ्या सोडण्यात नियोजनाचा अभावही दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून ७५ वर्षे वयावरील नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास आहे. ६५ वर्षांवरील नागरिक आणि महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत मिळाली आहे. शिवाय इतरही काही घटकाला काही प्रमाणात प्रवासात सवलत दिली जाते. यामुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जागा मिळत नसल्याने पुरुषच नव्हे, तर महिलांमध्येही भांडण होण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. सर्वत्र हे चित्र असताना काही ठिकाणी मात्र एकही प्रवासी न घेता बस धावतात.
सवलतीच्या माध्यमातून एसटीच्या उत्पन्नाची बाजू काही प्रमाणात सावरली जात असताना फेऱ्यांच्या नियोजनात ठेवल्या जात असलेल्या दोषामुळे या प्रयत्नावर पाणी फेरले जात आहे. किलोमीटर वाढविण्यासाठी वरिष्ठांचा हेका, वाहतूक नियंत्रकांकडून होत नसलेले फेऱ्यांचे योग्य नियोजन, यामुळे यात दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येते. ज्या मार्गावर प्रवासी मिळत नाही, तेथे लागोपाठ तीन ते चार फेऱ्या सोडल्या जातात. यातील काही फेऱ्या नेमके दोन-चार प्रवासी घेऊन तर काही एकही प्रवासी न घेता मार्गस्थ होतात. प्रामुख्याने विभाग नियंत्रकांचे नसलेले नियंत्रण यामुळे एसटीच्या उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याची ओरड आहे. आपण किलोमीटरचे टार्गेट पूर्ण केल्याचे वरिष्ठांना दाखविण्यासाठीही हा प्रयोग होत असल्याची चर्चा खुद्द महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
चालक-वाहकांना सक्ती नकोकेवळ किलोमीटर रद्द होऊ नये म्हणून फेऱ्या पूर्ण करण्यासाठी चालक-वाहकांवर सक्ती करू नये, असे महामंडळाचे परिपत्रक आहे. परिस्थितीचे अवलोकन करूनच बसफेऱ्यांचे नियोजन करणे महामंडळाला अपेक्षित आहे. स्थानकावर प्रवासी उपलब्ध नाही, असे चित्र असतानाही बसफेऱ्या सोडल्या जात असल्याचा महामंडळातीलच अनेकांचा अनुभव आहे.
तब्बल १४ दिवस धावली विनाप्रवासी बसमाहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये यवतमाळ आगारातील एक फेरी तब्बल १४ दिवस विनाप्रवासी धावली. घाटंजीहून रात्री ८ वाजता सुटणारी ही बसफेरी होती. यवतमाळहून सायंकाळी ७ वाजता ही बस सोडली जात होती. २६ दिवसांत यवतमाळातून केवळ ३८५ प्रवासी घेऊन जात अवघे १३ हजार ४८३ रुपये कमाई या फेरीने दिली. घाटंजी येथून रात्री ८ वाजता परतताना २६ दिवसांत या फेरीने केवळ ५८ प्रवासी आणले. उत्पन्न अवघे १६०० रुपये मिळाले. असाच प्रकार याच मार्गावर सायंकाळी ६.१५ वाजता जाणाऱ्या व रात्री ७.३० वाजता परत येणाऱ्या, ६.३० वाजता सुटणाऱ्या आणि ७.५० वाजता परत येणाऱ्या बसच्या बाबतीतही घडला आहे.