के.एस. वर्मालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव तालुक्यातील कापसाचे स्टेपल चांगले असल्याने विदेशातही मागणी आहे. मात्र यंदा पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. दिवाळीच्या तोंडावरही हमी भावात कापूस खरेदी सुरू झाली नाही. याचा फायदा व्यापारी वर्ग घेत असून कवडीमोल भावात दर्जेदार कापूस खरेदी केला जात आहे.राळेगाव येथे दिवसाला दोन हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. शुक्रवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने पाच हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी केला जातो. राळेगाव व वाढोणाबाजार येथे दोन व्यापाऱ्यांनी सरळ त्यांच्या जिनिंगमध्ये चार हजार ५०० ते चार हजार ७०० या दरात कापूस खरेदी सुरू केली आहे. याशिवाय रावेरी पाॅईंट, झाडगाव, वडकी, खैरी येथे चार हजार रुपयांपर्यंत कापसाची खेडा खरेदी जोरात सुरू आहे. सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी पैसा लागतो. त्याकरिता कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही. हीच संधी खासगी व्यापारी साधत आहे. जवळपास एक लाख क्विंटल कापूस खरेदी व्यापाऱ्यांकडे जाणार आहे.
शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागणार आहे. याचा फायदा व्यापारी घेणार आहेत. कापूस खरेदी तात्काळ सुरू करण्याबाबत आमदार प्रा.डाॅ. अशोक उईके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र इतर पक्षाचे स्थानिक नेते गप्प आहेत.
तालुक्यात ५० हजार हेक्टरमध्ये कापूसतालुक्यातील शेतकऱ्यांनी ५० हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली आहे. यासाठी अडीच लाख बियाण्यांच्या पाकिटांची विक्री अपेक्षित होती. प्रत्यक्षात दोन लाख २५ हजार पाकिटं विकली गेली. उर्वरित २५ हजार पाकिटेही एचटीबीटीची वापरण्यात आली. या प्रतिबंधित कापूस बियाण्यामुळे इतर शेतकऱ्यांना बोंडअळीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, असे सांगितले जाते.