पोलीस मुख्यालय : शिपायी-जमादारांच्या ‘ड्युटी’ लिलावाची दखल लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील पोलीस मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचा लिलाव केला जात असल्याच्या प्रकरणात शुक्रवारी राखीव पोलीस निरीक्षकाला संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पाचारण केले गेले होते. तेथे त्यांना जाब विचारला गेल्याची माहिती आहे. ‘यवतमाळ पोलीस मुख्यालयात ड्यूटींचा लिलाव’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेवून शुक्रवारी राखीव पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहायकाची पोलीस अधीक्षक कार्यालयात पेशी झाली. त्यांचा गेल्या काही महिन्यातील ड्यूटी चार्ट तपासला गेला. या पेशीपूर्वी बरीच सारवासारव केली गेल्याचे सांगितले जाते. या वृत्तानंतर मुख्यालयात ‘रिफे्रशर’ला सुटीवर न सोडण्याची ‘दक्षता’ घेतली गेली. कागदोपत्री हजेरी दाखवून गावाकडे गेलेल्यांना तातडीने परत बोलावून प्रत्यक्ष हजर होण्यास सांगितले गेले. गावाकडे गेलेली ही मंडळीसुद्धा मिळेल त्या गाडीने अवघ्या काही तासात पोलीस मुख्यालयात पोहोचली. पोलीस मुख्यालयात ड्युट्यांसाठी होणाऱ्या लिलावाने सामान्य कर्मचारी त्रस्त झाले होते. एक पैशाची वरकमाई नसताना या लिलावासाठी पैसे आणायचे कोठून, असा पेच त्यांना पडला होता. त्यामुळे त्यांना सातत्याने कठीण ठिकाणच्या ड्युट्यांवर नेमले जात होते. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर आता पुढील काही दिवस तरी लिलाव पद्धतीला ब्रेक लागून सामान्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कागदोपत्री हजेरीमध्ये अनेकदा उलाढालीची रक्कम पाच ते सात हजारांपर्यंत गेल्याची चर्चाही आता मुख्यालयातून ऐकायला मिळत आहे. ते पाहता तेथील उलाढाल किती मोठी असावी हे लक्षात येते. या उलाढालीचे ‘पाट’ नेमके कुठपर्यंत वाहात गेले हे शोधण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. पोलीस प्रशासनाने भविष्यात अकस्मात भेट दिल्यास मुख्यालयातील ड्युट्यांच्या सावळ्यागोंधळाचे पुरावे हाती येण्यास वेळ लागणार नाही.
राखीव निरीक्षकाला पाचारण
By admin | Published: May 28, 2017 12:41 AM