यवतमाळ : मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिला सकाळी साडेदहाच्या सुमारास घरी परतल्या तर दारासमोर पार्सल मॅनच्या वेशभूषेतील एकजण उभा होता. त्याला काही विचारेपर्यंत तर तो पसार झाला. घरात पाऊल ठेवतात तर घरफोडी झाल्याचे पुढे आले. चाेरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून लाखाचा ऐवज लंपास केला होता.
नेर शहरातील मातोश्री नगर येथील ही घटना आहे. विद्या शंकरराव राजूरकर येथे आईसह राहतात. शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्या दर्शनासाठी गेल्या. साधारण १०:३० च्या सुमारास त्या घरी परतल्या असता, दारात पार्सलमॅन लाल रंगाचा शर्ट घालून उभा होता. तुम्ही कशासाठी आलात अशी विचारणा करेपर्यंत पार्सल मॅन दारातून गायब झाला होता. घर पाहिले तर दारावरील कडीकोयंडा तुटलेला होता. घरात कपाट अत्यवस्थ पडले होते. कपाटातील १३ ग्रॅम सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची वेल चोरी गेली होती.
यापूर्वी देशमुख नगर येथील प्रवीण मासाळ यांच्या घरीही ते मंदिरात गेले असताना भाड्यात लपवलेले असेच ५००० हजार रुपये चोरीस गेले होते. त्यापूर्वी गाडगेनगर येथील नीलेश मुंदाने यांच्या घरी दुपारी १२ वाजता चोरी होऊन ७२ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली होती. दुचाकीवर पार्सल मॅन म्हणून येऊन चोरटे ऐवज लंपास करीत असल्याने शहरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी अशा घटनांना लगाम घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.