लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एका कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. प्रसवकळा सुरू झाल्यानंतर या महिलेला गंभीर अवस्थेत यवतमाळात आणण्यात आले होते. तिचे बाळ पोटातच दगावले होते. यामुळे प्रसूती करून बाळ काढण्यात आले. यानंतर मातेची चाचणीही कोरोना पॉझेटिव्ह आली.
मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या रूढा येथील विवाहिता मार्चमध्ये बाळंतपणासाठी माहेरी महादापूर (ता. झरी जामणी) येथे आली होती. गुरुवारी तिला प्रसवकळा सुरू झाल्यामुळे झरी येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले होते. या ठिकाणावरून गरोदर मातेला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणावरून तिला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान गरोदर मातेच्या पोटातील बाळ मृत पावले. प्रसूती करून बाळ काढण्यात आले. यानंतर महिलेला श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने तिला आयसोलेशन वॉर्डात हलविण्यात आले. तिचा स्वॅब तपासल्यानंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
याशिवाय, शुक्रवारी जिल्ह्यात पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात नेरचे तिघे, तर यवतमाळातील दोघांचा समावेश आहे. तर सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली. सध्या जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ झाली असून आतापर्यंत ११ मृत्यूची नोंद झाली आहे.