पार्डी निंबी (यवतमाळ) : गेल्या काही दिवसांमध्ये पार्डी, गणेशपूर, कवडीपूर शेतशिवारात बिबट्याचा वावर दिसत आहे. शेतातील गोठ्यावर बिबट्याने सलग दोन वेळा हल्ला करून पाळीव जनावरे फस्त केली. या घटनेने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आता हा बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र, त्याला पकडण्यासाठी वनकर्मचारी दिवसरात्र शोध घेत आहेत.
पाठोपाठ दोन दिवस शेतातील जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेनंतर वनविभागाने शोधमोहीम सुरू केली. तसेच परिसरातील सरपंचांना एक पत्र पाठवून सुरक्षा संदर्भात नागरिकांना सूचित करण्याचे आवाहन केले होते. जंगल परिसरात वनविभागाच्या वतीने कॅमेरे बसविण्यात आले होते. कवडीपूर जंगल परिसरात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात ३० सप्टेंबर रोजी ४ वाजण्याच्या सुमारास सदर बिबट्या टिपला गेला.
परिसरात त्याच्या पायांचे ठसेही आढळून आले आहेत. हा बिबट्या आता नागरी वस्तीकडे धाव घेऊ शकतो. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन पुन्हा एकदा वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील आठवड्याभरापासून वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत.