सचिंद्र प्रताप सिंह : भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनयवतमाळ : जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपासून बारावी, तर सात मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. यावर्षी शंभर टक्के कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बचत भवन येथे परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक त्यांनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी दीपककुमार मीना, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.परिक्षेसाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तथा महत्वाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना भरारी पथक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. या पथकांनी केंद्रांवर भेटी देऊन चांगल्या वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी काम करावे, असे ते म्हणाले. भरारी पथक दिवसभरात किमान तीन ते चार केंद्रांना भेटी देतील. किमान पाऊण ते एक तास पथकातील अधिकाऱ्यांनी केंद्रावर थांबून पाहणी करावी, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या दिवशी अधिक दक्ष राहून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.परीक्षा केंद्रावर बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप होणार नाही. तसेच केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. केंद्रात प्रवेश करताना कॉपीला पायबंद घालण्यासाठी संशयितांची तपासणी केली जाणार आहे. महिला, मुलींची तपासणी महिला पोलिस कर्मचारी घेतील. (प्रतिनिधी)बैठे पथकांची भूमिका महत्त्वाचीकॉपीला आळा घालण्यासाठी बैठे पथकांची भूमिका महत्त्वाची आहे. या पथकांनी अधिक दक्ष राहून काम केल्यास कॉपीवर पूर्णपणे आळा बसू शकतो. त्यामुळे या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या केंद्रांवर बैठे पथक असतानाही उपद्रव आढळून येतील, त्या पथकांवर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
कॉपीमुक्तीसाठी अभियान
By admin | Published: February 20, 2017 1:30 AM