प्राचीन हेमाडपंथी मंदिरांची दुरवस्था
मारेगाव : तालुक्यातील पांढरदेवी व वनोजादेवी येथे प्राचीन हेमाडपंथी बांधकाम असलेली मंदिरे आहेत. परंतु, या मंदिरांच्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने मंदिराची दुरवस्था झाली आहे. मंदिरांची पडझड होत आहे. त्यामुळे या मंदिरांची होणारी पडझड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
वन्यप्राण्यांचा बहरलेल्या पिकांवर डल्ला
मारेगाव : सध्या चांगल्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कापसाची पिके बहरली आहेत. या बहरलेल्या कोवळ्या पिकांवर रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी डल्ला मारत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून पिके कशी वाचवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. वनविभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्याने वाहनधारक त्रस्त
मारेगाव : तालुक्यातील करणवाडी ते कुंभा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची पुरती वाट लागली असून, ग्रामस्थांच्या वाहनाच्या नुकसानीबरोबरच आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आता तरी प्रशासनाने गंभीर अपघाताची वाट न पाहता रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या संयमाचा भडका उडण्याची भीती आहे.
पुस्तकाविना विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन
मारेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शालेय पाठ्यपुस्तक मंडळाने यंदा विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून न दिल्यामुळे पुस्तकाविना अभ्यास करण्याची वेळ यावर्षी विद्यार्थ्यांवर आली आहे.