रबी हंगाम : देखभाल दुरुस्तीच्या कामांना प्रारंंभच नाही पुसद/ उमरखेड : सिंचनातून समृद्धीसाठी बांधलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कालव्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून रबी हंगाम तोंडावर आला तरी देखभाल दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ झाला नाही. ठिकठिकाणच्या कालव्यात झुडूपे वाढले असून अनेक कालव्यांचे गेटही लंपास झाले आहे. अशा स्थितीत टेलपर्यंत पाणी पोहोचण्याची सूतराम शक्यता नाही. पुसद आणि उमरखेड उपविभागात असलेल्या सिंचन प्रकल्पातून आजही पूर्ण क्षमतेने सिंचन होताना दिसत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे कालव्याची झालेली दयनीय अवस्था आहे. इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा डावा कालवा उमरखेड तालुक्यातून जातो. मात्र या कालव्याची स्थिती दयनीय झाली आहे. कालव्यात ठिकठिकाणी झुडूपी वनस्पती वाढली आहे. अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी चोरट्यांनी चक्क कालव्याचे गेटच लंपास केले आहे. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता राहत नाही. यंदा अपुऱ्या पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे अल्पप्रमाणात पाणी सोडले जाणार आहे. सोडलेले पाणी शेतापर्यंत कसे पोहोचेल हाच प्रश्न आहे. उमरखेड तालुक्यासारखीच अवस्था महागाव तालुक्याचीही आहे. वेणी प्रकल्पाच्या निर्मितीपासून पूर्ण क्षमतेने कधीही सिंचन झाले नाही. या प्रकल्पाच्या कालव्यावर अनेक शेतकरी शेती करतात. परंतु त्यांना योग्य वेळी पाणीच मिळत नाही. अनेकदा तर कालव्यातून पाणी शेतात पाझरते त्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप निर्माण होते. पुसद तालुक्यातील कालव्यांचीही अशीच अवस्था आहे. निर्मितीपासूनच कालवे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. या कालव्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु कायम स्वरूपी दुरुस्ती केली जात नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारीही कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न मात्र अपूर्ण राहते. कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या असलेले कर्मचारी कधीही कालव्याची पाहणी करताना दिसत नसल्याचे शेतकरी सांगतात. (लोकमत चमू) खरुसच्या शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा उमरखेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत चालगणी शाखेच्या लघु वितरिकेसाठी खरुस येथील शेतकऱ्यांची जमीन २०१२ मध्ये संपादित करण्यात आली होती. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. पांडुरंग वानखडे यांची २५ गुंठे जमीन संपादित करण्यात आली. तिचा मोबदला दोन लाख ३१ हजार १६३ रुपये, सत्यपाल कांबळे यांच्या चार गुंठे जमिनीचा मोबदला ४० हजार ३२५ रुपये तर श्रीराम वानखेडे यांच्या १६ गुंठे जमिनीचा मोबदला एक लाख ६१ हजार २९८ रुपये आहे. शेतकऱ्यांनी वारंवार याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजविले. परंतु उपयोग झाला नाही. आता मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी पांडुरंग वानखेडे, सत्यपाल कांबळे, श्रीराम वानखडे यांनी उमरखेड येथे आयोजित पत्रपरिषदेत दिला. यावेळी संजय जयस्वाल उपस्थित होते.
कालव्यांची अवस्था बिकट
By admin | Published: October 17, 2015 12:44 AM