तानाजी सावंतांच्या जागेवर 'हा' उमेदवार, महाविकास आघाडीचं ठरलंय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 09:49 PM2020-01-26T21:49:02+5:302020-01-26T21:50:19+5:30
संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे ठरले.
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी 31 जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या निवासस्थानी रविवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. साडेतीनशेपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा असून त्यातील 280 मतदार अधिकृत आघाडीचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोणत्या तालुक्यात दगा फटका होऊ शकतो याचाही अंदाज घेण्यात आला.
संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे ठरले. त्यांनी आघाडीलाच मतदान करावे यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही ठरले. मतदान केंद्रात मतपत्रिकेचे फोटो काढणे, डमी मतपत्रिका टाकणे यासारखे प्रकार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना तर भाजपकडून गुन्हेगारांचा वापर मतदारांना धमक्या देण्यासाठी होण्याची शक्यता पाहता जिल्हा पोलिस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. शिवसेनेचे(महाविकास आघाडी) दृष्यांत सतीश चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरिया यांच्यात ही निवडणूक होत आहे.
संजय देरकर यांच्यासह 3 अपक्षही रिंगणात आहेत. या निवडणुकीत घोडेबाजार मोठया प्रमाणात होत आहे. सावधगिरी म्हणून दोन्ही उमेदवारांनी आपले काही मतदार राज्याबाहेर देवादर्षणाला पाठविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. माजी मंत्री तानाजी सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची ही पोटनिवडणूक होत आहे.
जिल्हा बँक निवडणूक सोबत लढविणार
26 मार्च रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदासाठी निवडणूक होत आहे, ही निवडणूक महाविकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्र लढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मंत्री संजय राठोड, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वाजहात मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, मनोहरराव नाईक, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, किर्ती गांधी, विजय खडसे, बाळासाहेब मागूलकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
सोमवारी काँग्रेसची बैठक
दरम्यान सोमवारी जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक होत असून त्यासाठी सकाळी 9.30 वाजता माजी मंत्री वसंत पुरके यांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक होत आहे.
आजच्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दृष्यांत चतुर्वेदी यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आणि उपाययोजना करण्याचे ठरले. जिल्हा सहकारी बँकेचे निवडणूकही महाविकास आघडीच्या झेंड्याखाली लढण्याचा निर्णय घेणायत आला.
अॅड. शिवाजीराव मोघे, माजीमंत्री, काँग्रेस