यवतमाळ : गांजाच्या सेवनातून अनेक गंभीर गुन्हे घडत आहे. यामुळे पोलिसांनी गांजा तस्करीचे रॅकेट पकडण्यावर लक्ष केंद्रित केले. यात यवतमाळ एलसीबीच्या टीमला यश आले आहे. थेट ओडिशा येथून यवतमाळ शहरात आणला जात असलेला १५ किलो ३७२ ग्रॅम गांजा तस्करांसह हाती लागला. तर पुसद तालुक्यात पारध येथे काका-पुतण्याच्या घरातून १३ किलो ६८२ ग्रॅम गांजा जप्त केला. हे दोघे शेतातच याचे उत्पादन घेत असल्याचे पुढे आले आहे.
यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी थेट मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न एलसीबी पथकाने केला. यात त्यांना यश आले. रेकॉर्डवरील गुन्हेगार सलमान शेख शकील शेख रा. अंबिकानगर यवतमाळ, चालक सलमान शेख इकबाल शेख (२६) रा. सुराणा ले-आऊट यवतमाळ हे दोघे मंगळवारी रात्री दरम्यान एमएच-३४-एए-११५७ क्रमांकाच्या इंडिका कारमधून गांंजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. देवगाव फाट्यावरून पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व बाभूळगाव येथे सापळा रचून या आरोपींना अटक केली. त्यांनी हा गांजा ओडिशा येथून आनंद शाहू रा. बडगड (ओडिशा) याच्याकडून आल्याचे सांगितले. तो ट्रक चालक अनिल यादव याने दिल्याची कबुली दिली. त्यावरून शहर पोलिसांनी या प्रकरणात चार जणांविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन लाख ७ हजार ४४० रुपयांचा गांजा तर इंडिका कार असा एकूण सहा लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पुसद तालुक्यातील पारध येथून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी याबाबत सलग दोन वेळा रेकी केली. नंतर सोमवारी संशयित आरोपी रमेश शिवराम जाधव याच्या घरी धाड टाकण्यात आली. पंचासमक्ष त्याच्या घरातून १३ किलो ६८२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत रमेश जाधव व त्याचा पुतण्या इंदल हिरालाल जाधव या दोघांविरुद्ध पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. एकूणच या दोन्ही कारवाईत २८ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख आधारसिंग सोनोने, पुसद ग्रामीण ठाणेदार राजेश राठोड, सहायक निरीक्षक विवेक देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.