नरभक्षक वाघिणीला खूप आधीच मारायला हवं होतं; काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 06:25 PM2018-11-08T18:25:10+5:302018-11-08T18:30:49+5:30
पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत.
यवतमाळ - नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी आवाज उठविला असला तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, तसे झाले असते तर अनेक शेतकरी-शेतमजुरांचे जीव वाचू शकले असते असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी केले आहे.
पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. अखेर वन खात्याने या वाघिणीला नुकतेच गोळी घालून ठार केले. मात्र तिला गोळ्या का घातल्या म्हणून वन्यजीवप्रेमींनी देशभर ओरड चालविली आहे. मुख्यमंत्री, वनमंत्री यांना धारेवर धरले जात आहे. वन खात्याची नियमावली वाचून दाखविली जात आहे. त्याच वेळी या दोन विधानसभा मतदारसंघांचे काँग्रेसकडून अनेक वर्ष प्रतिनिधीत्व करणारे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके (राळेगाव), अॅड. शिवाजीराव मोघे (केळापूर-आर्णी) आणि मिशनचे अध्यक्ष किशोत तिवारी यांनी मात्र जनतेच्या हितासाठी वाघिणीला ठार करण्याच्या वन खात्याच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
वन खात्याने संयम राखला - अॅड. मोघे
वन खात्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचे कोणतेही प्रयत्न न करता थेट गोळ्या घातल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींकडून होत असला तरी काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी वन खात्याने अवनीला पकडण्यासाठी खूप संयम राखला व वर्षभर प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. तिला ठार मारायचे नव्हते, बेशुद्ध करण्याचेच प्रयत्न झाले. मात्र ती टप्प्यात येत नव्हती. अखेर वन खात्याचाही नाईलाज झाला. कारण जनतेचे जीव महत्वाचे असल्याचे मोघे यांनी सांगितले.
वनखात्याने विलंब केला - प्रा. पुरके
माजी मंत्री प्रा. वसंत पुरके म्हणाले, वाघिणीने पहिली शिकार केल्यानंतर वन खात्याने लगेच पावले उचलून तिला बेशुद्ध करण्याचे, पकडण्याचे प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र वन खात्याने त्याकडे बरेच दुर्लक्ष केले. मध्यंतरीच्या काळात तिला बेशुद्ध करण्याच्या मिळालेल्या तीन संधी दवडल्या गेल्या. १३ जीव गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, वाघिणीच्या दहशतीत हजारो एकर शेती पडिक आहे. त्यामुळे तिचा बंदोबस्त करणे गरजेचेच होते. वन्यजीवप्रेमींनी प्रत्यक्ष वाघदहशतग्रस्त भागात भेट दिल्यास त्यांना ‘वास्तव’ कळू शकेल, असेही पुरके यांनी सांगितले.
मनेका गांधी शेतकरी विरोधी - तिवारी
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, दिल्ली, मुंबईत बसलेल्या वन्यजीवप्रेमींनी वन खात्याच्या वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेत याचिका व अन्य माध्यमातून सातत्याने अडथळे आणले. आजही ही मंडळी वन खात्यावर तोंडसुख घेत आहे. त्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत. मात्र त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. पर्यायाने त्यांच्याकडून सरकारवर केली जात असलेली टीका शेतकरी व आदिवासी विरोधी ठरत आहे. अशा आगावू मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळीच आवर घालावा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना विनम्रपणे दिलेल्या उत्तराचे किशोर तिवारी यांनी कौतुक केले आहे.