लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्याविना वर्षभर हाल भोगणारे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिक सध्या दिवसभर सुरू असलेल्या पावसाने घरातच ‘कैद’ झाले आहेत. पाय फसणाऱ्या रस्त्यावरून गाडी तर काय पायी चालणेही कठीण झाले आहे. लोहारा, वाघापूर परिसरातील विविध नव्या वसाहतींमधील हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. यासह भोसा, उमरसरा, वडगाव ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील वसाहतींच्या समस्याही दुर्लक्षित आहेत.या ग्रामपंचायती साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वी यवतमाळ नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. परंतु, ज्या विकासाच्या अपेक्षेने या ग्रामपंचायती पालिकेत विलीन झाल्या, तो विकास काही हद्दवाढ क्षेत्रात अवतरलेला नाही. या परिसरात रस्त्याची परिस्थिती सर्वात गंभीर झाली आहे.प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनेक नव्या वसाहती वसल्या आहेत. येथील वैभवनगर, सूर्योदयननगर, शुभम कॉलनी, सानेगुरुजी नगर, जिरापुरे ले-आऊट, चिंतामणीनगर, राधाकृष्णनगरी, सिद्धेश्वरनगर, गोकुलनगरी, प्रिया रेसिडेन्सी आदी भागात मुळात रस्त्याच्या नावावर केवळ मातीचे ढिग आहे. ते आता पावसाने चिखल आणि घाणीत रुपांतरीत झाले आहेत. सानेगुरुजीनगरसह वैभवनगरातील लोक तर जाता येता घसरून पडत आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पाऊस सुरू असेपर्यंत आणि पाऊस थांबल्यावर आठ-दहा तास घराबाहेर न पडणेच पसंत केले आहे. या परिसरातील नगरसेवकांचेही प्रचंड दुर्लक्ष होत आहे.भोसा परिसरात रस्त्यावरून गटार वाहताना दिसते. उमरसरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेने दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र निधी नसल्याने काम थंडबस्त्यात असल्याचे सांगितले जाते.प्रभाग क्रमांक १३ मधील रस्ते अतिशय चांगले आहे, असे नगरपालिकेला वाटत असेल तर पालिकेने येथील नागरिकांकडून टोल तरी वसूल करावा आणि आपले उत्पन्न वाढवावे, अशी खोचक टीका लोहारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तुषार देशमुख यांनी केली आहे.
हद्दवाढीतील नागरिक रस्त्याविना घरातच ‘कैद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 10:00 PM
रस्त्याविना वर्षभर हाल भोगणारे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिक सध्या दिवसभर सुरू असलेल्या पावसाने घरातच ‘कैद’ झाले आहेत. पाय फसणाऱ्या रस्त्यावरून गाडी तर काय पायी चालणेही कठीण झाले आहे.
ठळक मुद्देपालिकेचे दुर्लक्ष : लोहारा, वाघापूर, वडगाव, उमरसरा, भोसा परिसरात संताप