लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रंगमंचावर आसनस्थ होत व्यक्त होताना भल्याभल्यांची पंढरी घाबरते. अनेकांना यावेळी शब्द सुचनासे होतात. यवतमाळातील एक चिमुकली आज आपल्या प्रदेशाबाहेर आपली वकृत्व कला कीर्तनाच्या माध्यमातून सादर करते आहे.हभप सई पंचभाई असे या ११ वर्षे वयाच्या चिमुकलीचे नाव आहे. विदर्भासह मराठवाडा, राज्याची सांस्कृतिक नगरी पुणे आणि हैैदराबादसारख्या अमराठी शहरामधील नागरिकांना सुद्धा तिने आपल्या कीर्तनाची गोडी लावली आहे. अनेक ख्याती प्राप्त कीर्तनकारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बालकीर्तनकार म्हणून सईला सुद्धा कीर्तन करण्याचा मान प्राप्त झाला आहे. कारंजा (जि. वर्धा) येथे झालेल्या राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धेत बाजी मारत सईने प्रथम क्रमांक सुद्धा प्राप्त केला आहे.प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, एकलव्य, छत्रपती शिवाजी महाराज अशा कठीणातल्या कठीण विषयावर सईने आजवर कीर्तने केली आहेत. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींकडून चिमुकल्या सईवर कौतुकाचा वर्षात होऊ नये तर नवलच !सईला आजोबा मधुकर पंचभाई यांच्याकडून कीर्तनाचा वारसा मिळाला. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सहाव्या वर्गात शिकणाऱ्या सईने इयत्ता तिसरीमध्ये असताना पहिले कीर्तन केले. थोडे थोडके नव्हे तर तीन वर्षात तिने विविध विषयांवरील तब्बल ९० कीर्तने धाडसाने सादर केले आहे.पुण्यातील कीर्तन महोत्सवात बाल कीर्तनकार म्हणून कीर्तनाचा मान मिळालेल्या सईने यवतमाळचे नाव उंचावले. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, हभप मंजूश्री खाडिलकर, राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर महाराज उपासनी यांच्या सारख्या नावाजलेल्या कीर्तकारांच्या रांगेत सई होती.
कीर्तनातून वक्तृत्व कलेची जोपासना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:20 PM