यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा वनविभागांतर्गत वनपथकाने गोळी घालून ठार केलेल्या नरभक्षक वाघीण अवनीच्या मृत्युची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. डॉ. एस.एच. पाटील (पीसीसीएफ, उत्पादन व व्यवस्थापन) हे या समितीचे अध्यक्ष आहेत. वन्यजीव संरक्षण ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया हे सदस्य, तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोळकर (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. शासनाच्या 6 नोव्हेंबरच्या आदेशान्वये ही समिती गठित करण्यात आली.
चार मुद्यांवर या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपूर्वी या समितीला आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करायचा आहे. समितीकडे चौकशीसाठी केवळ १३ दिवस आहेत. पांढरकवडा वनविभागांतर्गत कळंब, राळेगाव व केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने गेल्या काही महिन्यात तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली आहे. बेसावध असलेल्या या व्यक्तींवर शेतशिवारात अचानक हल्ला करून वाघिणीने त्यांच्या नरडीचा घोट घेतला. त्यामुळे उपरोक्त मृतांचे कुटुंबीय उघडे पडले आहे, मुले-बाळे अनाथ झाली आहेत. या वाघिणीच्या दहशतीमुळे सायंकाळी या तीन तालुक्यातील प्रमुख रस्ते ओस पडत होते. शेतशिवारात जाण्याची कुणाची हिंमत नव्हती. लोक घराबाहेर पडण्यासही घाबरत होते. पर्यायाने हजारो हेक्टर शेती पेरणीनंतर दुर्लक्षित झाली. ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण जनतेत शासन व विशेषत: वनविभागाविरूद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला होता. त्यातूनच सखी (कृष्णापूर) या गावात वनखात्याचे समजून चक्क उपविभागीय दंडाधिकाºयांचे वाहन पेटवून देण्यात आले होते. ग्रामीण जनतेच्या जीवावर उठलेल्या या वाघिणीला जेरबंद करा, शक्य नसेल तर ठार मारा व तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करून रेस्क्यू सेंटरला पाठविण्याचे आदेश नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी ४ सप्टेंबर २०१८ रोजी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये दिले होते.
शनिवारी वनपथकाने साधला नेम२ नोव्हेंबर २०१८ रोजी बोराटी-वरूड-राळेगाव रस्त्याच्या कडेला कक्ष क्र.१४९ मध्ये दस्त पथकाला नरभक्षक वाघिण आढळून आली. तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने व वाघिणीने पथकावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने अखेर स्वसंरक्षणार्थ झाडलेल्या गोळीत नरभक्षक वाघिण ठार झाल्याचे वनखात्याच्या चौकशी समिती स्थापन करण्यासंबंधीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. विशेष असे, अवनीने १३ पैकी बहुतांश शिकारी शनिवारीच केल्या आणि दुर्दैवाने तिची शिकारसुद्धा शनिवारीच झाली.
देशभर उठली आरोळीअवनीच्या मृत्यूनंतर वनपथकाच्या प्रामाणिक प्रयत्नावर प्रश्नचिन्ह लावले गेले. बेशुद्ध न करता अवनीला थेट गोळ्या घालून ठार केल्याची ओरड देशभर होऊ लागली. खुद्द वन्यजीव प्रेमी तथा केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी याबाबत साशंकता व्यक्त केली. अखेर या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करून पारदर्शक पद्धतीने तपासणी, चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाकडे वन्यजीवप्रेमी तसेच अवनीमुळे सुमारे दोन वर्षांपासून दहशतीत असलेल्या तीन तालुक्यातील दोन डझन गावच्या हजारो नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
हे आहेत चौकशीचे मुद्दे- ४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आदेशानंतर टी-१ वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न झाले.- २ नोव्हेंबर २०१८ रोजी टी-१ वाघिणीला मारण्यासाठी मोक्क्यावर तातडीची काय परिस्थिती निर्माण झाली याचा शोध घेणे.- टी-१ वाघिणीला शोधून काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीचे विश्लेषण समितीला करावे लागणार आहे.- उपरोक्त वाघिण प्रकरणात सर्व नियमांचे, मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले आहे किंवा कसे, याचा तपशील.