ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ ग्रामीण भागात घराच्या अडगळीत पडून असणाऱ्या शेणाच्या गोवऱ्याही आॅनलाईन शॉपिंगवर विकत मिळतात. खरे वाटत नाही ना? पण खात्री पटवायची असेल तर कोणत्याही आॅनलाईन कंपनीच्या साईटवर जा आणि केवळ ‘काऊ डंग केक’ एवढे टाईप करा विविध आॅफर्ससह आणि सवलतीत गोवऱ्या तुम्हाला मिळतील. अलीकडे आॅनलाईन शॉपिंगचा धमाका सुरु आहे. विविध माध्यमातून सवलतीच्या दरात वस्तू विकण्याचा प्रकार सुरू आहे. सुईपासून टीव्हीपर्यंत आणि साडीपासून पिलो कव्हरपर्यंत सर्व काही घरपोच मिळत आहे. दुकानापेक्षा स्वस्तात वस्तू मिळत असल्याने अनेकांच्या उघड्या आॅनलाईन शॉपिंगवर पडत आहे. गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीय ग्राहकांचा कल दिसतो. सणासुदीच्या काळात तर या आॅनलाईन शॉपीमध्ये ७० टक्क्यापर्यंत सवलत दिली जाते. काही चॅनल्स तर २४ तास वस्तूंची विक्री करीत असतात. त्यासोबत बक्षिसांचेही आमिष असते. भारतीय मानसिकतेची प्रचंड जाण असलेल्या या आॅनलाईन शॉपींगवाल्यांनी आता अनेकांना भुरळ घातली आहे. मात्र या साईटवर गोवऱ्याही विकत मिळतात, असे कुणाला कितीही सांगितले तरी विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. आता या शॉपीमध्ये काय मिळत नाही हेच सांगणे कठीण आहे. ‘काऊ डंग केक’ अर्थात शेणाच्या गोवऱ्या. ग्रामीण आणि शहरी भागात गोवऱ्यांचा विविध उपयोग केला जातो. चूल पेटविण्यापासून ते होमहवनापर्यंत. ग्रामीण भागता शेणाच्या गोवऱ्या घरीच थापतात. त्याला तशी किंमतही नसते. कुणी चार-दोन गोवऱ्या मागितल्यातर तशाच दिल्या जातात. परंतु त्याच गोवऱ्या चकचकीत वेष्टनातून आता तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी केवळ आॅनलाईन शॉपिंगच्या साईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. तीनपासून ते कितीही गोवऱ्या तुम्हाला येथे खरेदी करता येतील. घरी पासर्ल आल्यावर पैसे द्यावे लागतील. गोवऱ्याचंी ‘ओनली फॉर आॅर्गेनिक’ अशी जाहिरात केली जाते. यासोबतच गोवऱ्याचा आकार आणि व्यासही त्या जाहिरातीत सांगितला जातो. आता तुम्हाला गोवऱ्या थापण्याची गजर नाही, तुमच्या घरीच शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट पॅकमध्ये येतील. यातून गोवऱ्या थापणाऱ्यांना नवीन रोजगाराची संधी मिळाणार, हे मात्र तेवढेच खरे.
आॅनलाईन शॉपिंगवर शेणाच्या गोवऱ्या
By admin | Published: October 17, 2015 12:46 AM