राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीसीआयमधील (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीसीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पी.के. अग्रवाल यांनी दिले आहेत.पी.के. अग्रवाल (मुंबई) यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला सांगितले की, सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्यामार्फत सीसीआयच्या कापूस खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. या चौकशीत जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळ्याची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली. त्याची दखल सीसीआयच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. रूईमध्ये तीन किलोची घट दाखवून ‘मार्र्जिन’ ठेवली जात आहे. शेतकऱ्यांचा चांगला कापूस कमी दर्जाचा ठरवून सीसीआयकडून नाकारला जात आहे. शेतकरी मग नाईलाजाने हा कापूस अडीच ते तीन हजार रुपये क्विंटलने व्यापाऱ्यांना विकतो. व्यापारी हाच कापूस कुण्यातरी शेतकऱ्यांच्या सातबारावर दाखवून पुन्हा सीसीआयला विकतात. सीसीआयचे ग्रेडर ‘सेटिंग’मुळे हा कापूस डोळे लावून स्वीकारतात व त्याला प्रति क्विंटल साडेपाच हजारांचा भावही दिला जातो. या पद्धतीने शेतकऱ्यांना गंडविले जात आहे. आधीच नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सीसीआयच्या खरेदी केंद्रावर नागविले जात आहे.
विदर्भ, मराठवाडा, खान्देशपर्यंत व्याप्तीसीसीआयच्या कापूस खरेदीत राज्यात बहुतांश ठिकाणी घोटाळा आहे. शेतकऱ्यांच्या नाकारलेल्या कापसावर दोन ते अडीच हजारांची मार्जीन ठेवली जात आहे. त्यातूनच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. सीसीआयच्या अकोला व औरंगाबाद झोन अंतर्गत येणाऱ्या विदर्भ, मराठवाडा, खान्देश या सर्वच भागातील खरेदी केंद्रांवर हा घोटाळा असल्याची माहिती आहे. मुख्य महाव्यवस्थापकांमार्फत होणाऱ्या या चौकशीत सीसीआयमधील अनेक ग्रेडर्सच्या कारनाम्यांचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिनिंग-प्रेसिंग मालकांचाही पर्दाफाशया चौकशीत जिनिंग-प्रेसिंग मालकांची चलाखीही उघड होणार आहे. त्यांनी आपल्याकडील कमी दर्जाच्या कापसापासून बनलेल्या रूईगाठी सीसीआयमध्ये दिल्या असून तेथील चांगल्या दर्जाच्या गाठी आपल्याकडे घेतल्या आहेत. या अॅडजेस्टमेंटचीही चौकशी होणार आहे.