लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीसीआयमधील कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्याची यवतमाळातून सुरू झालेली चौकशी विदर्भात आठवडाभर चालणार आहे. दरम्यान सीसीआयच्या पथकाने अनेक ठिकाणांहून रूईचे नमुने घेतले आहे.सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्याची दखल घेत सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही (मुंबई) यांच्याकडे चौकशी सोपविली गेली. या पथकाने विदर्भातील चौकशीचा प्रारंभ यवतमाळातून केला. तत्पूर्वी त्यांनी औरंगाबादमध्ये तपासणी केली. एस.के. पानीग्रही यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सुमारे आठवडाभर विदर्भात ही चौकशी चालणार आहे. यवतमाळशिवाय वर्धा, नागपूर व अन्य काही ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. काही केंद्रांवरील रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले. त्याची तपासणी केली जात आहे. काही ठिकाणांवरून रुईगाठीचे नमुनेही घेतले गेले. या नमुन्यांची तपासणी मुंबईच्या शासकीय प्रयोगशाळेत केली जाईल. गोदामांनाही भेटी देऊन तेथे असलेल्या रूईगाठींच्या वजनाची तपासणी केली जात आहे. सीसीआयच्या जिनिंग-प्रेसिंगमधील अनेक खरेदी केंद्रांना भेटी दिल्या गेल्या आहेत. ग्रेडर्सलाही विचारणा केली गेली. कुठेही गडबड आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. कुणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. यापूर्वी गैरप्रकार आढळलेल्या ठिकाणी ग्रेडर्सवर कारवाई केली गेली. त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. एका ग्रेडरला बडतर्फ केले गेले होते, अशी माहिती पानीग्रही यांनी दिली. यावेळी सीसीआयचे अकोला येथील महाव्यवस्थापक अजय कुमार उपस्थित होते.मुकुटबनच्या आगीत ३० टक्के नुकसानझरी तालुक्यातील मुकुटबन येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर आगीची घटना घडली. त्याचीही चौकशी केली जात आहे. तेथील रेकॉर्डची तपासणी केली गेली. रेकॉर्डनुसार १५०० ते १८०० क्ंिवटल कापूस केंद्रावर होता. मात्र संपूर्ण कापूस जळलेला नाही. ओला झालेला कापूस वाळविला जात आहे. विमा कंपनीकडे ३० टक्के नुकसानीचा दावा केला जाणार आहे. कापसात दगडाचा तुकडा आल्याने मशीनमध्ये ठिणगी उडाली आणि आग लागली, असे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. त्यात तथ्यांशही वाटतो आहे. तरीही आगीचे अन्य पैलूही तपासले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.