लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी नववर्षाच्या स्वागतासाठी आता घरातच बेत आखावा लागणार आहे. देशभरात ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णात चिंताजनक वाढ होत असल्याने प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे जोखीम न घेता थर्टी फर्स्टचा जल्लोष यंदाही कुटुंबीयांसोबतच साजरा करण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ७८१ वर जाऊन पोहोचला होता. अगदी शेजारच्या नागपूर, नांदेड जिल्ह्यांतही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले असल्याने नव्या नवर्षाचे सेलिब्रेशन करताना सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्य शासनानेही वाढता धोका लक्षात घेऊन रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्री नऊनंतर हॉटेलसह गर्दीच्या ठिकाणी जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याऐवजी घरातच कुटुंबीयांसह साधेपणाने ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करावे. पोलीस प्रशासनाने सर्व आस्थापना, रेस्टॉरंट, मॉल्स, विविध दुकाने, तसेच उपगृहामध्ये ग्राहकाने, तसेच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक केलेले आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतर राखून परिसर निर्जंतुकीकरण करणेही बंधनकारक आहे. या नियमांचे व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांवर उपचार- जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमायक्रॉन बाधित कोरोना रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यासमोर वाढत्या कोरोनाचा धोका कायम आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजवर ७२ हजार ९७९ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७१ हजार १८५ जणांनी कोरेानावर मात केलेली असून, आजवर या आजारामुळे १७८८ जणांचा मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगून उत्साह साजरा करण्याची आवश्यकता आहे.