सोनखास-उत्तरवाढोणा परिसर : दुष्काळापासून मुक्ती ठरतेय दिवास्वप्न लोकमत न्यूज नेटवर्क सोनखास : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे शासनाने हाती घेतली आहे. परंतु नेर तालुक्यात ज्या पद्धतीन ेवर्षभरातच सिमेंट बंधारे खचले आहेत ते पाहता दुष्काळ व पाणीटंचाईपासून मुक्तीचा संकल्प हा दिवास्वप्नच ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा परिसरात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तालुक्यातील आठ गावांचा जलयुक्त शिवारमध्ये समावेश करण्यात आला आहे. उत्तरवाढोणा येथे नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच सिमेंट बंधाऱ्याची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. परंतु सिमेंट बंधाऱ्याची कामे एका वर्षातच खचत असल्याने शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी, कंत्राटदार, अधिकारी आदींच्या संगनमतातून ही कामे करण्यात आली आहेत. परंतु अतिशय निकृष्ट दर्जाची कामे झाल्यामुळे वर्षभरातच हे सिमेंट बंधारे पूर्णपणे खचल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार या नावीण्यपूर्ण योजनेतून जलसंधारणाअंतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनांची कामे केली जाणार असून २०१९ पर्यंत संपूर्ण तालुक्यातील दुष्काळ व पाणीटंचाई संपविण्याचा शासनाचा संकल्प आहे. सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांमध्ये ज्याप्रमाणे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले त्यावरून इतरही कामांचा अंदाज यावा, केवळ वेळेच्या आत कामे करून कागदपत्र ओके केले जात आहे. प्रत्यक्षात या योजनेमागील शासनाचा हेतू त्यातून साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांना आढळून येणाऱ्या या बाबी संबंधित शासकीय विभागांच्या वरिष्ठांना का दिसत नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षापासून उत्तरवाढोणा परिसरात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे अभियान नावापुरतेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशाच पद्धतीने या पुढीलही कामे झाल्यास दुष्काळमुक्ती आणि शेतीला पाणी हा शासनाचा मूळ हेतू यातून साध्य होईल, असे दिसत नाही.
वर्षभरातच खचले सिमेंट बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:58 AM