यवतमाळ: वादळाच्या तडाख्याने रातचांदणा गावातील सिमेंटचे घरही कोसळले. छत उडाल्यामुळे अनेकांचा संसार आकाशाच्या छताखाली आला. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळवाºयामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लगतच्या धामणी गावालाही वादळाने झोडपून काढले.
अवघ्या पाच मिनिटाच्या वादळाने या गावातील नागरिकांचा श्वास रोखला गेला होता. क्षणाक्षणाला घरावरील आणि जनावरांच्या गोठ्यावरील टीनपत्रे पत्त्याच्या पानाप्रमाणे उडत होती. घरात असलेल्या मंडळींचा जीवही धोक्यात आला होता. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
प्रल्हाद नामदेवराव चुटे यांचे सिमेंट काँक्रिटचे घर वादळामुळे पूर्ण जमिनदोस्त झाले. घराचा स्लॅब तुटून पडला. राजा भेंडारकर यांच्या घरावर असलेल्या सिमेंटच्या टीनपत्र्यांचा अक्षरश: चुराडा झाला. देवराव वाडेकर, चंपत मेश्राम यांच्या घरावरील छत उडाले. अरविंद बेंडे यांच्या शेतातील गोठा होत्याचा नव्हता झाला. त्यांच्या शेतात असलेले शेडनेटही फाटले. याशिवाय विनोद हेमने, तुळशीदास हेमने, गजानन मेंढे, गणेश हेमने, प्रमोद बेंडे यांच्यासह इतरही लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. सोमवारी सकाळी या गावातील मंडळी घर सावरण्याचा प्रयत्न करत होती. धामणी गावाला तडाखा
रविवारी झालेल्या वादळाचा धामणी गावालाही जोरदार तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. झोपडीवजा घरांचे नुकसान झाले. गोठ्यावरील छत उडाल्यामुळे उन्हाळ्यात जनावरांना बांधण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई मिळावी, अशी या नुकसानग्रस्तांची अपेक्षा आहे.