रामेश्वर उराव यांची माहिती : प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन आयोग तपासणी करणार, जात प्रमाणपत्राचीही पडताळणीपांढरकवडा : जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलांना योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारीवर आयोग गंभीर असून त्याची दखल घेणार असल्याचे केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर उराव यांनी शनिवारी येथील विश्रामगृहात सकाळी घेतलेल्या बैठकीत सांगितले.सर्व तक्रारींचा पाठपुरावा करून आश्रम शाळेला भेटी देऊन, सत्य परिस्थिती बाहेर आणून आदिवासींना त्यांचे हक्क मिळावे, या दृष्टीने आयोग कार्य करीत असून या तक्रारीची चौकशी करून जिल्हा प्रशासन व राज्य सरकारला योग्य सुखसुविधा देण्याचे निर्देश देणार असल्याचे डॉ.उराव म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आयोगाचे निरीक्षक केतन शर्मा, आमदार प्रा.राजू तोडसाम, अप्पर आयुक्त अशोक आत्राम, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संभाजीराव सरकुंडे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, अरूण देऊळकर, मदन जिड्डेवार, बशीर भाई, रमेश उग्गेवार, मंगेश वारेकर, धर्मा आत्राम, बळवंत नैताम, शिवारेड्डी पाटील, महादेव सूरपाम, भावराव मरापे, धर्मा आत्राम उपस्थित होते. डॉ.उराव पुढे म्हणाले की, देशामधील अनेक आश्रमशाळांमध्ये योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यात जिल्ह्यासह या आश्रमशाळेच्या असुविधेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. या तक्रारींची आयोगाने गंभीर दखल घेतली असून आयोग स्वत: आश्रम शाळेची तपासणी करीत आहे. तसेच आलेल्या तक्रारीबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे, अशा आश्रमशाळांची तपासणी करून राज्य शासनाला योग्य सुखसुविधा पुरविण्यासाठी आयोग निर्देश देणार आहेत, तसेच गरज पडल्यास केंद्र सरकारचा निधीसुद्धा आयोग उपलब्ध करून देणार आहे, असे ते म्हणाले. तसेच आयोगाला बनाटव जाती प्रमाणपत्राबाबतही अनेक तक्रारी आल्या असून बनावट जाती प्रमाणपत्राच्या आधारे अनेकजण आदिवासींच्या योजनेचा लाभ घेत आहे. अशा बनावट आदिवासींवर आयोग कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदिवासींच्या हक्काबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या असुविधेबाबत आलेल्या तक्रारीत योग्य निवास, भोजन, शिक्षण मिळत नसल्याचा उल्लेख आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, योग्य भोजन मिळावे, यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. येथील विश्रामगृहात सकाळी डॉ.उराव यांचे आगमन झाले. त्यांचे स्वागत आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी केले. त्यानंतर उराव यांनी नेते, लोकप्रतिनिधी व पत्रकारांशी संवाद साधला. नंतर नागरिकांनी समस्येबाबत आणलेले निवेदन स्विकारले. यानंतर ते प्रा.तोडसाम यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी)
आश्रमशाळांच्या असुविधांची केंद्रीय आयोगाकडून दखल
By admin | Published: September 20, 2015 12:19 AM