फोटो
पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालयाला शनिवारी केंद्रीय आरोग्य पथकाने भेट दिली. पथकाने डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयातील व्यवस्थेची माहिती घेतली.
केंद्रीय आरोग्य पथकाचे सदस्य डॉ. आरती बहेल व डॉ. देवेन भारती यांनी शनिवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली. त्यांनी प्रथम लसीकरण केंद्र व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली. येथील लसीकरण केंद्रात १६ जानेवारीपासून आत्तापर्यंत सहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे; मात्र मागील तीन दिवसांपासून लसींचा तुटवडा असल्याने नागरिकांना परत जावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.
डेडिकेटेड कोविड सेंटर ५० बेडचे असून, सध्या ११ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य पथकाला देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांनी पथकाला माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार अशोक गीते, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड,
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
बॉक्स
रेमडेसिवीरचा तुटवडा
पुसद शहर व तालुक्यात कोरोनावरील रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब पथकाच्या निर्दशनास आणून देण्यात आली. शहरातील कोणत्याही मेडिकलमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा जीव टांगणीला आहे. रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रेमडेसिवीरसाठी नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून कोरोना रुग्णांचे जीव वाचवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.