वणी : वणी व मारेगाव तालुक्यात मिरची पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले. त्याची पाहणी करण्यासाठी दिल्ली व पुणे येथील सहा शास्त्रज्ञांच्या पथकाने वणी व मारेगाव तालुक्याला भेट दिली. वणी व मारेगाव तालुक्यात दीड हजार हेक्टरवर मिरची पिकाची लागवड करण्यात आली. मात्र या पिकावर अज्ञात रोग आला. फवारणी करूनही हा रोग दूर झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मारेगाव येथील मिरची उत्पादक शेतकरी डॉ.भास्कर महाकुलकर, श्रीनिवास पामल पाटील यांनी भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्लीकडे पिकाची पाहणी करण्याबाबत विनंती केली होती. त्यावरून दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. विश्वास मंडल, डॉ.बर्नाल, डॉ.नारायण भट, डॉ.अमलेंद्र घोष व पुणे येथील डॉ.स्वाती शहा, डॉ.त्रिपाठी यांनी बुधवारी व गुरूवारी वणी व मारेगाव तालुक्यातील मिरची पिकाची पाहणी केली. त्यांनी वणी तालुक्यातील आनंद काळे यांच्या शेतातील पॉली हाऊसमधील ढेमसे, टोमॅटो व मिरची पिकांची पाहणी केली. सोनेगाव येथील रविकांत जयस्वाल व सुरेंद्र चव्हाण यांच्या शेतातील मिरची पिकांची पाहणी केली. त्यानंतर रासा येथील सतिश पिंपळे यांच्या नैसर्गीक शेतीचीही पाहणी केली. या पाहणीत या पथकाने रोग व कीडग्रस्त पिकांचे नमूने उत्तरीय तपासणीकरिता सोबत घेतले. पथकासोबत तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड, आनंद बदखल, के.के.कोल्हे, विलास बरडे, संजय जयस्वाल, डी.एच.बन्सोड, बी.व्ही.वनकर, व्ही.एस.फुलमाळी, डॉ.भास्कर महाकुलकर आदी उपस्थित होते. या पाहणीत काही शेतकऱ्यांनी रोगामुळे मिरची पीक उपटून टाकल्याचेही दिसून आले. अज्ञात किडी व रोगामुळे मिरची पिकाच्या उत्पादनात घट आल्याचेही लक्षात आले. या पाहणीनंतर आता मिरचीवरील हा रोग नेमका कोणता आहे, याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
केंद्रीय चमूने केली मिरची पीक पाहणी
By admin | Published: January 09, 2016 2:54 AM