सुरज पाटील
यवतमाळ : शाळांमध्ये भाैतिक सुविधा देताना शिक्षण विभागाकडून यू-डायसच्या माहितीचा आधार घेतला जाताे. २०२४-२५ या वर्षासाठी स्कूल, स्टुडंट आणि टीचर हे तिन्ही पाेर्टल ऑनलाइन माहिती भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात आले हाेते. त्यात विदर्भातील नागपूर, गाेंदिया, गडचिराेली आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांनी आघाडी घेत सेंच्युरी मारली असून लातूर जिल्हा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
राज्यात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची एकूण संख्या एक लाख आठ हजार ५३२ आहे. यू-डायसमध्ये एक लाख तीन हजार ३०२ शाळांची माहिती अपलाेड करण्यात आली आहे. विदर्भातील चारही जिल्ह्यांची टक्केवारी ही शंभर आहे. शाळांना लागणाऱ्या वर्गखाेल्या, शाैचालय, सुरक्षा भिंत यासह अन्य सुविधांसाठी लागणारा निधी यू-डायसमधील माहितीच्या आधारे दिला जाताे. गणवेश, पुस्तकांची संख्याही याच आधारावर निश्चित केली जाते. स्कूल पाेर्टलमध्ये शाळांत असलेल्या सुविधा, स्टुडंट पाेर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, रक्तगट टीचर पाेर्टलमध्ये शाळेत कार्यरत सर्व शिक्षकांची माहिती नाेंदविण्यात आली आहे.
बुलढाण्याचा २५ वा क्रमांक विदर्भातील नागपूर, गाेंदिया, गडचिराेली, यवतमाळ हे जिल्हे राज्यात टाॅप आहेत. मात्र, अन्य चार जिल्हे मागासले आहेत. यात बुलढाणा २५ व्या क्रमांकावर आहे. अकाेला २६ वा, वाशिम २९ वा आणि अमरावती ३० व्याक्रमांकावर आहे.
राज्यातील सर्व शाळांची माहिती अपलाेड झालेली एकूण टक्केवारी ९५.१८ इतकी आहे. यू -डायस म्हणजे यूनीफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफ एज्युकेशन. देशातील कोणत्याही शाळेची यू - डायसमधील माहिती किंवा स्कूल रिपोर्ट कार्ड या वेबसाईटवर मिळू शकतात. देशातील कोणत्याही शाळेचा यू - डायस क्रमांक हा ११ अंकी असतो. यातील सुरवातीचे दोन अंक हे राज्यांचा क्रमांक दर्शवितात, तर दुसरे दोन अंक हे जिल्ह्याचा क्रमांक दर्शवितात.