लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने घोषित केलेली सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द ठरविली. आता अकरावी प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने राबवावी, याबाबत राज्य मंत्रिमंडळाचा खल सुरू आहे. पण शासनाचा नवा निर्णय येण्यापूर्वीच जिल्ह्यात ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रियाही गुपचूप सुरू झाल्याचे चित्र आहे.राज्य शासनाकडून ज्या काही नव्या गाईड लाईन येतील, त्यानुसारच अकरावीचे प्रवेश दिले जातील, अशी भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. परंतु, प्रत्यक्षात निर्णयाची वाट न पाहता पालक महाविद्यालयांमध्ये धाव घेत आहेत. जिल्ह्यात दहावीचे ३७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अकरावीच्या तब्बल ३९ हजार जागा उपलब्ध असल्याने प्रवेश मिळण्याबाबत कोणतीही अडचण नाही. परंतु, दहावीचा भरघोस निकाल बघता सर्वांनाच मनाप्रमाणे महाविद्यालय मिळेल का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळेच शासनाचा सुधारित निर्णय येईल तेव्हा येईल, पण आतापासूनच आपली ॲडमिशन पक्की करून ठेवावी, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. तर आपली पटसंख्या टिकून राहावी, यासाठी ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांनी आताच ‘गुपचूप’ ॲडमिशन सुरू केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जागा भरपूर असल्यातरी सर्वांना यवतमाळ, वणी, पुसद अशा मोठ्या शहरांमध्ये महाविद्यालयातच प्रवेश हवे आहे. त्यामुळे काही दिवसांनी गर्दी होईल, या भीतीपायी आतापासूनच प्रवेश देण्याची घाई पालकांकडून केली जात आहे. तर ग्रामीण भागातील महाविद्यालये विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु यापूर्वी शिक्षण विभागाने दिलेले ‘सीईटीशिवाय प्रवेश नको’ हे आदेश आता बासनात गेले आहे. तर पालकही शासनाच्या नव्या आदेशाची वाट पहायला तयार नाही.
विद्यार्थ्यांचे नुकसान नाही - शिक्षणाधिकारी नव्या गाईड लाइन येण्यापूर्वीच महाविद्यालयांनी प्रवेश देणे सुरू केल्याबाबत अद्यापतरी आमच्याकडे माहिती नाही. मात्र काही महाविद्यालयांनी दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश सुरू केले असतील, तर अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. महाविद्यालयांनी क्षमतेऐवढेच प्रवेश द्यावे. - दीपक चवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ
प्राचार्य म्हणतात, स्पर्धा वाढली
आता प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी खुली झाल्याची पालकांची भावना आहे. पालक प्रवेशासाठी आमच्याकडे गर्दी करीत आहे. मात्र दहावीचे बहुतांश विद्यार्थी ९० टक्क्यावर गुण मिळविणारे ठरले. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा आहे. - प्राचार्य साक्षी बनारसेरामभाऊ ढोले महाविद्यालय, यवतमाळ
न्यायालयाने विद्यार्थी हितासाठी जरी सीईटी रद्द केली आहे, तरी याचा परिणाम अकरावी प्रवेशाबाबत नक्कीच पहायला मिळणार आहे. कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी राज्य शासनाने घ्यावी.-प्राचार्य लीना बैसगुरूकुल काॅलेज, जवळा
विद्यार्थी चिंतेत
दहावीत अपेक्षित गुण न मिळाल्याने सीईटीत प्राविण्य मिळवून आवडती शाखा मिळविण्यासाठी आशा निर्माण झाली होती. पण आता सीईटीही रद्द झाली. त्यामुळे काळजी वाटत आहे.- श्रृष्टी कांदेकर, विद्यार्थिनी
काही विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले आहे. त्यामुळे आवडत्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. नंतर सीईटीत गाळणी झाली असती. पण सीईटी रद्द झाली. आता स्पर्धा वाढणार आहे. - तनुश्री नडपेलवार, विद्यार्थिनी