दिशाहीन कारभार : अर्ध्या अधिक शाळांना नाही मुख्याध्यापकयवतमाळ : जिल्हा परिषद शाळा सध्या दिशाहीन आहेत. नवनवे उपक्रम राबवित असताना मुख्याध्यापकच बेपत्ता असल्याने शाळांची अवस्था शिड तुटलेल्या जहाजासारखी झाली आहे. जिल्ह्यातील ७५ टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापक नाही. त्यामुळे सहायक शिक्षकांनाच जबरदस्तीने मुख्याध्यापकपदाचा प्रभार देण्यात आला आहे. जबरदस्तीच्या प्रभाराने अध्यापनावर विपरित परिणाम होत आहे.जिल्ह्यात जवळपास दोन हजार शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जातात. प्रत्येकच शाळेला कार्यक्षम कारभारासाठी मुख्याध्यापकाची गरज आहे. परंतु, दोन हजारपैकी केवळ ४२१ शाळांमध्येच पात्र मुख्याध्यापक (उच्च श्रेणी) कार्यरत आहे. तर साधारण दीड हजार शाळा मुख्याध्यापकाविना पोरक्या आहेत. अशा शाळेतील एखाद्या सहायक शिक्षकालाच मुख्याध्यापक पदाचा प्रभार देऊन वरिष्ठ अधिकारी मोकळे झाले. मात्र, अध्यापनाचे कार्य सांभाळून मुख्याध्यापक पद सांभाळताना या सहायक शिक्षकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे आम्हाला हे मानाचे मुख्याध्यापक पद नको, असा सूर आता उमटू लागला आहे.मुख्याध्यापकाचे पद प्रत्येक शाळेला आवश्यक असले तरी, एखाद्या शाळेला मुख्याध्यापक द्यायचा की नाही, ही बाब त्या शाळेच्या पटसंख्येवर अवलंबून आहे. २०१३ मध्ये जिल्ह्यात साधारण ५०० मुख्याध्यापकाची पदे होती. पण १३ डिसेंबर २०१३ ला आलेल्या शासन निर्णयानुसार दीडशे पटसंख्या असल्यासच मुख्याध्यापक पद मंजूर करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्ह्यात केवळ २३१ पदे उरली. काही शिक्षक याविरुद्ध न्यायालयात गेल्याने २३ मे २०१३ रोजी हा निर्णय बदलण्यात आला व सध्या जिल्ह्यात ४२१ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. मात्र, जिल्ह्यात शाळा आहेत दोन हजार. त्यामुळे तब्बल दीड हजार सहायक शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार नाईलाजाने वहावा लागत आहे. याविरुद्ध संतापाची भावना असूनही वरिष्ठांचा आदेश असल्याने मारूनमुटकून हे शिक्षक जमेल तसा कारभार पाहात आहेत. त्याहूनही वाईट अवस्था म्हणजे जिल्ह्यात द्विशिक्षकी शाळांचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी दोन पैकी एक शिक्षक मुख्याध्यापकाचा प्रभार पाहतो. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनासाठी केवळ एकच शिक्षक उरतो. साहजिकच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘प्रभारा’ने पिचले दीड हजार शिक्षक
By admin | Published: November 13, 2015 2:18 AM