अविनाश साबापुरे, यवतमाळ : बहुचर्चित जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे अखेर ३ जानेवारीला राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत:च शुक्रवारी पत्रपरिषद घेऊन घोषणा केली. तर नवीन अध्यक्ष सर्वानुमते ठरणार असल्याचे व आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तब्बल २८ संघटनांची मोट बांधून तयार झालेल्या परिवर्तन आघाडीने १८ महिन्यांपूर्वी पतसंस्थेवर सत्ता मिळविली. सर्वच्या सर्व २१ संचालक बहुमताने निवडून आल्यानंतर आघाडीचे समन्वयक मधुकर काठोळे यांच्याकडे सर्वानुमते अध्यक्षपद दिले गेले होते. ते आता जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झाले आहे. सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही संचालकाला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहता येणार नाही, असे वचन परिवर्तन आघाडीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार, आपण नैतिक जबाबदारी पाळत ३ जानेवारीला राजीनामा देत असल्याचे काठोळे यांनी शुक्रवारी घोषित केले.
दरम्यानच्या काळात संचालकांची बैठक घेऊन सर्वानुमते नवे अध्यक्ष निवडले जाईल, असे ते म्हणाले. आपण संचालक म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहोत, असे सांगताना त्यांनी गेल्या १८ महिन्यात पतसंस्थेच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेला पतसंस्था संचालक सुभाष धवसे, शरद घारोड, तुषार आत्राम, नदीम पटेल, स्वप्नील फुलमाळी, संजय बिहाडे आदी उपस्थित होते.