बहुतांश राजकीय आश्रयाला : नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतेय कामकाज यवतमाळ : जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. आपल्या ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे पहिले आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. कारण बहुतांश पोलीस अधिकारी हे राजकीय आश्रयाला गेल्याने नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत. यातून सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एम. राज कुमार हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक लाभले आहेत. त्यांची ठाणेदारांशी तोंड ओळख झाली आहे. पहिल्या क्राईम मिटींगच्या वेळी या ठाणेदारांची कदाचित खरी ओळख होईल. ‘एसपी’ संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन आपली जिल्ह्याची हद्द तपासत आहेत. जिल्ह्यात सध्या सामाजिक शांतता आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. संघटित गुन्हेगारी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मात्र ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांपुढे राहणार आहे. कारण वणीपासून उमरखेडपर्यंतचे बहुतांश पोलीस अधिकारी राजकीय आश्रयाला आहेत. त्या बळावरच त्यांनी आपली सोईने नियुक्ती करून घेतली आहे. आजही ते आणखी सोईची पोस्टींग मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. यातील काहींना अमरावतीतून खुला ‘आशीर्वाद’ मिळतो आहे. काहींचे थेट वरपर्यंत लागेबांधे आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला ते फारसे जुमानत नसल्याचे बोलले जाते. सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘वरकमाई’चे कारणामे खुलेआम सुरू आहे. त्याला गेल्या दोन वर्षात कठोरतेने प्रतिबंध घातला गेला नाही. कधी तसा प्रयत्नही केला असता राजकीय ‘इन्टरेस्ट’ त्यात आडवा आला. युतीची सत्ता असल्याने या पक्षाचे अनेक पदाधिकारी अशा ‘इन्टरेस्ट’च्या कामात ‘व्यस्त’ आहेत. त्यामुळे ठाणेदारांना जाब विचारायचा कुणी असा प्रश्न आहे. ही जबाबदारी आता नव्या पोलीस अधीक्षकांनाच पार पाडावी लागणार आहे. ठाणेदारांवर पोलीस प्रशासनाने आपला वचक निर्माण केल्यास निवडणुका शांततेत पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि आगामी सण-उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करणे कठीण नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे ‘एसपीं’पुढे आव्हान
By admin | Published: January 21, 2017 1:27 AM