जिल्हा परिषद : भाजपा, शिवसेनेशी तगडी फाईट यवतमाळ : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमोर जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखण्याचे आव्हान उभे झाले आहे. भाजपा आणि शिवसेनेने या दोन्ही पक्षांपुढे आडदांडा निर्माण केला आहे. सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसचे २३, तर राष्ट्रवादीचे २१ सदस्य आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेचे १२, तर भाजपाचे चार सदस्य आहे. याशिवाय मनसे व अपक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आता हेच संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे उभे ठाकले आहे. आत्तापर्यंत बहुतांश काळ या दोनच पक्षांनी जिल्हा परिषदेवर सत्ता गाजविली. ग्रामीण भागात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. त्याच बळावर आजपर्यंत या पक्षाने जिल्हा परिषद व बहुतांश पंचायत समितींवर वर्चस्व कायम राखण्यात यश प्राप्त केले. मात्र सध्या स्थिती बदलली आहे. केंद्र्र व राज्यात भाजपा व सहकारी पक्षांची सत्ता आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेने नजरेत भरण्याजोगे यश प्राप्त केले. त्यामुळे या पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच बळावर हे दोनही पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र ग्रामीण भागाची नाळ अद्याप भाजपाशी जुळली नाही. त्यामानाने शिवसेनेने ग्रामीण भागात बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेतच खरी लढाई होण्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील लढाईत भाजपा आणि राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहणार आहे. पुसद विभागात राष्ट्रवादीचा जोर कायम राहणार की, ओसरणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे इतर पक्षांतील इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी बहाल केल्याने भाजपाचे कार्यकर्ते एकदिलाने त्यांच्या उमेदवारांसाठी काम करणार का, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. नवा-जुना वाद त्यांना घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे भाजपातील काहींना काँग्रेसनेही ऐनवेळी उमेदवारी बहाल केली आहे. (शहर प्रतिनिधी) नाराजांची मनधरणी सुरू काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, या चारपही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड नाराजी खदखदत आहे. या नाराजांमुळे क्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत सापडण्याची भीती आहे. मात्र कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितींवर झेंडा फडकवायचाच, असा चंग बांधलेल्या सर्वच पक्षांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत हे बंडोबा थंड झाले, तर ठीक, अन्यथा ते त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना नक्कीच गोत्यात आणणार आहे. पक्षांतर्गंत अडचणींवर मात करून सर्वच पक्षांना वर्चस्व स्थापित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहे. त्यातही भाजपा व शिवसेनेसोबत तगडी फाईट असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार आहे. तूर्तास काँग्रेस नेते एकदिलाने आपापल्या विधानसभा मतदार संघात पक्षाच्या उमेदवारांसाठी मेहनत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे वर्चस्वाचे आव्हान
By admin | Published: February 06, 2017 12:10 AM