जिल्हा परिषद सभापतींचा ताबा : समिती वाटपापूर्वीच केबिनवर कब्जा, बाब लक्षात येताच केली सारवासारवयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि दोन सभापतींनी चक्क अध्यक्षांच्या अधिकारालाच आव्हान दिले. त्यांनी विषय समिती वाटपापूर्वीच समित्यांचा ताबा घेतला.जिल्हा परिषदेत पाच विषय समित्या असतात. त्यापैकी दोन विषय समित्या उपाध्यक्षांकडे सोपविण्यात येतात. उर्वरित दोन समित्यांसाठी प्रथम केवळ सभापती निवडले जातात. महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समितीसाठी थेट सभापती निवडले जातात. या दोन समित्यांच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल करतानाच त्यावर समितीचा उल्लेख असतो. त्यामुळे हे दोन सभापती त्याच दिवशी त्या समितीचे सभापती म्हणून ओळखले जातात. मात्र उपाध्यक्ष आणि दोन सभापतींना कोणती विषय समिती द्यायची, याचा निर्णय पहिल्या विशेष सभेत अध्यक्षांना घ्यावयाचा असतो. अध्यक्षांच्या याच अधिकाराला उपाध्यक्ष आणि दोन सभापतींनी आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. नवनिर्वाचित दोन सभापतींनी बुधवारी शिक्षण व आरोग्य आणि बांधकाम व अर्थ समितीचा ताबा घेतला. त्यांचे अनेकांनी या दोन समित्यांवर निवड झाल्याबद्दल कौतुक केले. संबंधित विभागाशी निगडीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली. यामुळे हे दोन सभापती त्या समितीचे सभापती असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सत्ता स्थापनेसाठी एकत्र येताना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार त्यांनी आपापल्या समितीचा ताबा घेतल्याचे यावरून दिसून आले. मात्र यामुळे अध्यक्षांच्या अधिकारालाच आव्हान देण्यात आले आहे.संंबंधित दोनही सभापतींना याबाबत विचारणा केली असता त्यांनी अद्याप आपणाला विषय समिती मिळाली नसल्याची सारवासारव केली. आपण केवळ केबीनचा ताबा घेतला असून अद्याप समितीचे वाटप झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी नेमक्या शिक्षण व आरोग्य आणि बांधकाम व अर्थ याच समित्यांच्या केबिनचा कसा काय ताबा घेतला, या प्रश्नावर ते निरूत्तर झाले. (शहर प्रतिनिधी)
अध्यक्षांच्या अधिकाराला पदाधिकाऱ्यांचे आव्हान
By admin | Published: April 07, 2017 2:22 AM