तारीख निश्चित : शिक्षकांंबाबत संभ्रम लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेत येत्या ११ मे पासून बदल्यांचा पोळा फुटण्यास सुरूवात होणार आहे. सर्व विभागांतील बदल्यांसाठी समुपदेशनाची तारीख निश्चित झाल्याने बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. राज्य शासनाने ३१ मे पूर्वीच कोणत्याही स्थितीत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची ताकीद जिल्हा परिषदेला दिली आहे. त्यानुसार प्रशासनाने बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार केल्या. आता सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील विनंती व प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशनाची तारीख निश्चित केली आहे. त्या-त्या तारखेला संबंधित विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून त्यांना समुपदेशनाने नियुक्ती दिली जाणार आहे. ११ मे पासून ही बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी पशुसंवर्धन, सिंचन, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी बोलाविण्यात आले आहे. १२ मे रोजी सामान्य प्रशासन, वित्त, कृषी आणि बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. सर्वात शेवटी १५ मे रोजी प्राथमिक शिक्षण व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. या सर्वांना समुपदेशनाने नियुक्ती दिली जाणार आहे. संघटना न्यायालयात बदली प्रक्रियेतील काही बाबींवर शिक्षक संघटनांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र प्रशासनाने विनंती व प्रशासकीय बदलीपात्र शिक्षकांनाही १५ मे रोजी पाचारण केले. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या समुपदेशनाला उपस्थित राहावे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
जिल्हा परिषदेत बदल्यांचा पोळा फुटणार
By admin | Published: May 08, 2017 12:15 AM