रूपेश उत्तरवार
यवतमाळ : सोयाबीन पिकावर चारकोल रॅट व्हायरसने हल्ला चढविला आहे. विदर्भ, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये सोयाबीनला मोठा फटका बसत आहे. यातून एकूण उत्पादन निम्म्याने कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोयाबीनच्या अधिक दिवसाच्या वाणावर याचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत.
सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मिळवून देणारे बेल्ट म्हणून विदर्भ, मध्य प्रदेश आणि तेलंगणा प्रांताकडे पाहिले जाते. यावर्षी या ठिकाणी अधिक कालावधीच्या सोयाबीन पिकावर ‘चारकोल रॅट’ या नव्या व्हायरसने आक्रमण केले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधनातून ही बाब पुढे आली आहे. वातावरणात निर्माण झालेल्या उष्ण आणि दमट वातावरणाने ही स्थिती निर्माण झाली. या व्हायरसला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे सोयाबीनचे पीक अचानक वाळत आहे. त्याला किडीसह आतमधून पोखरले गेले आहे. सोयाबीन पिवळे आणि काळेही पडत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेंगावर काळे ठिपके आहेत. पानावरही डाग पडत आहेत. यातून शेंगा वेळेपूर्वी वाळत असल्याने शेंगा भरण्याचे प्रमाण मधातच थांबले आहे. यातून सोयाबीनच्या एकूण उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.
येलो मोझॅक, खोड किडी आता ‘चारकोल रॅट’
यावर्षी येलो मोझॅक नावाचा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. रात्रीतून शेत पिवळे पडत आहे. यात काही ठिकाणी खोड किडीचे आक्रमण झाले आहे. यात झाडाच्या बुंद्यात आतमध्ये अळी आहे. यामुळे वेळेपूर्वी झाड वाळत आहे. फुले संगम, फुले आंबा, फुले दुर्वा आणि ३३५ या व्हरायटीवर या व्हायरसने आक्रमण केले आहे. त्यातच चारकोल रॅट हा व्हायरस आहे. उष्ण आणि दमट वातावरणामुळे हा निर्माण झाला आहे. यात झाडे सोकली आहेत. काळी पडली आहेत. यात पानावर आणि शेंगावर काळे ठिपके पडत आहे. झाडाला एकही शेंग शिल्लक राहत नाही, अशी अवस्था या व्हायरसमुळे निर्माण झाली आहे.
दरावर परिणाम होणार
सोयाबीनचे उत्पादन घटले तर याचा थेट दरावर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्गासह कृषी अभ्यासक वर्तवित आहेत. मात्र, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
अधिक दिवसाचा कालावधी असणाऱ्या आणि फुले जातीच्या वाणावर हे आक्रमण पाहायला मिळाले आहे. यवतमाळ, बाभूळगाव, आर्णी, उमरखेड, पुसद, महागाव, दिग्रस याठिकाणी पाहणीत हे उघड झाले. याशिवाय जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत येलो मोझॅक आणि ‘चारकोल रॅट’चे आक्रमण झाले आहे. याशिवाय मध्य प्रदेश आणि तेलंगणातही हा व्हायरस वाढत आहे.
- डॉ. प्रमोद यादगिरवार, सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, मध्य विदर्भ, केव्हीके