यवतमाळ : दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. बेवारस मृतदेहाची ओळख पटल्यानंतर खुनाची घटनाही उघड झाली. आरोपीच्या दुचाकीवर जबरदस्ती बसून त्याच्यासोबत वाद घातला. यातच आरोपीने डोक्यात दगड घालून खून केला.
गजानन मारोती राठोड (४४) रा. जवळा हा गेल्या अनेक दिवसांपासून दारूच्या नशेत घराबाहेरच राहत होता. जवळा बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीवर झोपत होता. ३० ऑगस्टच्या रात्री तो दारू पिवून २.३० वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराच्या मागे लागला. रस्त्यात दुचाकी अडवून त्याच्यासोबत झटापट करू लागला. जबरदस्तीने गजानन त्या दुचाकीवर बसला. दुचाकीस्वार त्याला घेऊन यवतमाळला आला. गजानन दुचाकीस्वाराला मारहाणही करू लागला. त्याच्या जाचाला त्रस्त झालेल्या दुचाकीस्वाराने गजाननला भोयर बायपासवरील मोचन ढाब्याजवळ आणले. तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून ठार केले. नंतर तो तेथून निघून गेला.
अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात मृतदेह मिळाल्याची शोधपत्रिका जारी केली. यातून गजाननचा मुलगा जयसिंग राठोड याला वडिलाच्या हत्येची घटना समजली. त्याने तत्काळ अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून मृतदेहाची ओळख पटविली. पोलिसांना वडिलांच्या सवयीबाबत सांगितले. गजानन हा दारूच्या नशेत रस्त्यावर वाहन थांबून त्यात बसून कुठेही जात होता. नंतर तो तेथून परत येत होता किंवा कुुटुंबीयांकडून त्याला आणले जात होते.
३० ऑगस्टलासुद्धा गजानन असाच वाहनावर बसून गेला, असा अंदाज त्याच्या मुलाने पोलिसांकडे व्यक्त केला. त्यावरून ठाणेदार मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी तपास हाती घेतला. जवळा येथे जाऊन पोलीस चौकी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात गजानन तेथे गोंधळ घालताना आढळून आला. रात्री २.३० वाजताच्या सुमारास तेथील गुरख्याने गजाननची दुचाकीस्वारासोबत झटापट झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच गुरख्याने पोलिसांना संशयिताच्या दुचाकीचा क्रमांक दिला. पोलिसांनी त्या दुचाकीचा शोध सुरू केला.
आरटीओ कार्यालयात ती दुचाकी संजय सावरकर या व्यक्तीच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. नंतर त्याने ही दुचाकी शुभम नावाच्या युवकाला विकल्याची माहिती मिळाली. शुभमने ती दुचाकी चापडोह येथे भाड्याने राहणाऱ्या एकाला दिल्याचे समजले. पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. आरोपी सुरेश सोनबाजी बोरकर (४२) रा. चापडोह याला अटक केली. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे सुरेश हा ज्या परिसरात गजाननची हत्या झाली. तेथील ढाब्यावर नोकर म्हणून कामाला होता. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली आहे.