- निश्चिलसिंग गौरडोंगरखर्डा (यवतमाळ) : शिवपुत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात यंदा यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला राज्याभिषेकाचा मान देण्यात आला. कळंब तालुक्यातील वैशाली येडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला राज्याभिषेक करण्यात आला. राजांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदरवर झालेल्या या सोहळ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपुत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला. राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना रितसर निमंत्रण पत्रिका पाठवून बोलावून घेण्यात आले होते. वैशाली येडे निमंत्रण प्राप्त झाल्यावर आपल्या दोन्ही मुलींसह पुरंदर गडावर हजर झाल्या. गडावरील सोहळ्यात वैशाली येडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराजांना साकडे घातले. यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमींसह मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
साहित्यिक विसरले, महाराष्ट्र नव्हे!२०१९ मध्ये यवतमाळात झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या नावावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर ऐनवेळी वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून सन्मान देण्यात आला. उद्घाटनाच्या भाषणातून वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तडाखेबाज भाषण केले होते. मात्र, साहित्यिकांनी वर्षभरातच त्यांचे नाव अडगळीत टाकले. यंदा उस्मानाबादमध्ये झालेल्या ९३ व्या संमेलनात वैशाली येडे यांना साधे निमंत्रण पाठविण्याचेही औचित्य साहित्यिकांनी दाखविले नाही. मात्र साहित्यिक त्यांना विसरले, तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणूनच पुरंदर किल्ल्यावर झालेल्या शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक अभिषेकाचा मान देण्यात आला, अशी प्रतिक्रिया राजूर गावातून उमटत आहेत.