यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपची मते फोडण्यात यशस्वी झाल्याने महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांचा ११३ मतांनी पराभव केला. चतुर्वेदी यांना २९८ तर बाजोरिया यांना १८५ मते मिळाली. सहा मते अवैध ठरली.शिवसेनेचे तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली होती. ३१ जानेवारी रोजी मतदान झाले. सर्व ४९८ मतदारांनी हक्क बजावला. मंगळवारी मतमोजणी होऊन दीड तासात निवडणुकीचा निकाल लागला.
महाविकास आघाडीकडे २७८ मते होती. तर भाजपकडे १४८ व काही अपक्षांचे संख्याबळ होते. मात्र त्यांना आपली मते राखता आली नाही. त्यामुळेच चतुर्वेदींना २९८ मते, तर बाजोरिया यांना १८५ मते पडली. नेमका कुठे दगाफटका झाला, याचा शोध भाजप नेते घेत आहेत. महाविकास आघाडी एकसंघ राहणार नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटतील, अशी अपेक्षा भाजपला होती. परंतु भाजपचा पराभव झाला.ही पोटनिवडणूक शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि भाजप नेते माजी पालकमंत्री आमदार मदन येरावार यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.
शिवसेनेत प्रवेश करताच उमेदवारी
दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे सुपुत्र आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला विश्वास आणि यवतमाळकर जनतेने दिलेल्या विजयी आशीर्वादाबाबत आपण आभारी आहोत. आमचे नेते संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात विकासाची कामे करत राहू, असे दुष्यंत म्हणाले.