काळ्याबाजाराला लगाम : जीपीआरएस प्रणाली असलेले वाहन पोहोचविणार धान्य यवतमाळ : स्वस्त धान्य वितरण आणि काळाबाजार असे समीकरण जिल्ह्यात झाले आहे. अनेक प्रयत्न करूनही या प्रकारावर आळा बसविण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळेच आता जिल्ह्यात स्वस्त धान्यासाठी द्वारपोच योजना सुरू होणार आहे. तसेच धान्य पोहोचविणारे वाहन जीपीआरएस प्रणालीने जिल्हा पुरवठा विभागाशी जोडले जाणार आहे. यातून काळाबाजारीला लगाम लागेल, अशी आशा प्रशासनाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार १० स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानांमधून दरमहा हजारो गोरगरिबांना गहू, तांदूळ, साखर पुरविली जाते. जिल्ह्यातील पाच लाख २४ हजार ६९९ कार्डधारक या दुकानांमधून धान्य घेतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून धान्य वितरणाबाबत प्रशासनाकडे प्रचंड तक्रारी येत आहे. महागाव आणि यवतमाळ येथे तर स्वस्त धान्य वितरणाचा घोटाळाही उघडकीस आला होता. गोरगरिबांचे धान्य काळ्या बाजारात विकले जात होते. त्यामुळे कार्डधारकांना धान्यच मिळत नव्हते. यावर मात करण्यासाठी आता द्वारपोच योजना सुरू करण्यात आली आहे. शासकीय गोदामातून धान्य थेट दुकानात पोहोचणार आहे. तसेच गोदामातून दुकानापर्यंत धान्य घेऊन जाणारे वाहन जीपीआरएस प्रणालीने जिल्हा पुरवठा विभागाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे धान्य घेऊन निघालेले वाहन कोणत्या मार्गाने आणि कुठे गेले याचा तत्काळ शोध लागले. गावात धान्य थेट आल्यानंतर पंच कमिटीसमोर धान्य विक्रेत्याच्या सुपूर्द होणार असून त्यानंतर कार्डधारकांना त्याचे वितरण केले जाईल. या योजनेसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या योजनेची जिल्हाभर अंमलबजावणी केली जाणार आहे. (शहर वार्ताहर)
स्वस्त धान्यासाठी द्वारपोच योजना
By admin | Published: October 30, 2014 10:58 PM