अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विजेचे बिल आले तरी अंतिम तारखेपर्यंत भरायचेच नाही, अशी खूणगाठ बहुतेकांनी मनाशी बांधलेली असते. त्यातही अंतिम तारखेला वीज बिल धनादेशाद्वारे भरले जाते. नेमके असे चेक बाउन्स होतात. फेब्रुवारीचे बिल अशाच पद्धतीने भरणाऱ्या तब्बल १० हजार ग्राहकांचे धनादेश बँकेत अनादरित झाले. त्यामुळे महावितरणला बिल मिळाले नाही अन् ग्राहक थकबाकीदार ठरला. उलट बँकांना मात्र ३५ लाख रुपये दंडापोटी मिळाले.फेब्रुवारी महिन्याची वीजबिले ग्राहकांना मार्चच्या शेवटी भरायची होती. बिलाची रक्कम रोख स्वरुपात आणि आॅनलाईनही भरण्याची सुविधा आहे. तरीही राज्यातील तब्बल ७ लाख ग्राहक दर महिन्याला धनादेशाद्वारे बिल भरतात, अशी महावितरणची आकडेवारी आहे. फेब्रुवारीचे बिल धनादेशाद्वारे भरणाऱ्या ग्राहकांपैकी तब्बल दहा हजार ग्राहकांचे चेक बाऊन्स झाले. अशा प्रत्येक चेक पोटी बँकांनी ३५० रुपयांचा दंड वसूल केला. महाराष्ट्रातील एकंदर ग्राहकांच्या चेक बाऊन्स प्रकरणाचा आढावा घेतल्यास बँकांच्या दंडाची रक्कम ३५ लाखांवर पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक महिन्यालाच जवळपास दहा हजार चेक बाउन्स होतात, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. एकट्या वीज बिलाच्या धनादेशातूनच बँका वर्षाला सव्वाचार कोटींचा दंड मिळवित आहे.
६०० कोटींचा भरणा आॅनलाईनअमरावती परिमंडळात दर महिन्याला सुमारे ५४ वीज बिलाचे चेक बाऊन्स होतात. गेल्या वर्षभरात ६४९ चेक बाऊन्स झाले. त्यामुळे लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी बिल भरण्यासाठी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या आॅनलाईन सुविधा वापराव्या, असे आवाहन महावितरणच्या अमरावती परिमंडळाने केले आहे.सध्या राज्यातील ३५ लाख ग्राहक महावितरणच्या अॅपवरून सुमारे ६०० कोटी रुपयांचा बिल भरणा करीत आहेत. महावितरणने ही संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.