मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला : जिल्हा परिषद निवडणूक रवींद्र चांदेकर यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीतील आमदारांचा परफॉर्मन्स तपासण्याचा निर्णय भाजपाने घेतला. थेट मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांच्या मतदार संघातून भाजपाचे नेमके किती जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य विजयी झाले, याचा लेखाजोखा मागितला असून त्यात जिल्ह्यातील भाजपाच्या पाचपैकी दोन आमदारांवर टांगती तलवार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेणे सुरू केले आहे. दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारांची हीच कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. आमदारांची कामगिरी तपासण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भाजप आमदाराच्या विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची स्थिती काय होती, याची बारीकसारीक माहिती घेणे सुरू केले. यात कोणत्या आमदाराची कामगिरी सरस आणि कोणत्या आमदाराची निरस, याचा हिशेब ठेवला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी १८ जागा जिंकून भाजपाने दुसरे स्थान पटकाविले आहे. शिवसेनेने २० जागा जिंकून पहिला क्रमांक पटकाविला. ही बाब भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. भाजप आणि शिवसेनेचे विळ्या-भोपळ्याचे सख्य असल्याने पुढील विधानसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. स्वत:च्या बळावर पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील भाजप आमदारांची कामगिरी तपासली जात आहे. पालकमंत्र्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातून भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात यश प्रात केले. त्याचप्रमाणे वणी आणि राळेगावच्या आमदारांनीही आपल्या मतदार संघात भाजपाला बऱ्यापैकी विजयी करून पक्षात वजन वाढविले. मात्र केळापूर-आर्णी आणि उमरखेडचे आमदार जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या लेखी नापास ठरल्याची माहिती आहे. भाजपाला किमान २७ ते २८ जागांवर सदस्य निवडून येतील, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र केळापूर आणि उमरखेडच्या आमदारांची कामगिरी ढेपाळल्याने पक्षाला १८ जागांवरच थांबावे लागले, असे सांगितले जात आहे. हाच लेखाजोखा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. त्यावरून मुख्यमंत्री याबाबत संबंधित आमदारांना जाब विचारण्याची शक्यता आहे. नंतर पुढील दोन वर्षांत आपापल्या मतदार संघात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांना निर्देश दिले जातील. त्याउपरही पक्षाची गत अशीच राहिल्यास दोन आमदारांना पुढील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविताना प्रचंड कठीण जाणार आहे. यामुळे सर्वच आमदारांना हुरहूर लागली आहे. मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात, अशी धास्ती आमदारांना सतावत आहे. पक्षापेक्षा आमदार झाले मोठे ! मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेने भाजपाचा विजय सुकर झाला. नवखे उमेदवार १५ दिवसांत आमदार बनले. आता काही आमदारांच्या डोक्यात आमदारकी भीनली आहे. आपण स्वत:च्या बळावर निवडून आलो, असे काहींना वाटत आहे. दुसरीकडे विविध मुद्यांवरून जनतेच्या मनात काही भाजप आमदारांची ‘इमेज’ नकारात्मक (निगेटीव्ह) निर्माण झाली आहे. मात्र तरीही त्यांना पक्षापेक्षा आपण मोठे झाल्याचा भास होतो, असे भाजपमधीलच काही धुरीणांचे मत बनले आहे. पुढील दोन वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच त्यांना त्यांची खरी किंमत कळण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत वेळ निघून जाईल. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा तर मागितला नसावा ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. भाजपात शिस्त बिघडली, सोईचे राजकारण पूर्वी भाजपाला तत्त्वनिष्ठ पक्ष म्हणून ओळखले जायचे. मात्र आता भाजपप्रमाणेच बहुतांश पक्षात पूर्वीसारखे नेते आणि कार्यकर्ते उरले नाही. आता सर्व राजकारण सोयीनुसार चालत आहे. त्याचा प्रत्यय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना आला. देश व राज्यात प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेसलाच थेट अध्यक्षपद देऊन भाजपाने तत्त्वनिष्ठतेचा बुरखा स्वत:च फाडून टाकला. काँग्रेसमध्येही तत्त्वनिष्ठता उरली नाही. त्यामुळे त्यांचेही नेते जिल्हा परिषदेत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसतात, मात्र बाहेर मंचावर भाजपवर आसूड ओढतात. यामुळेच हल्लीचे राजकारण नेते, उमेदवार व संबंधित पक्षांच्या सोयीनुसार चालत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपाच्या आमदारांचा परफॉर्मन्स तपासणार
By admin | Published: April 20, 2017 12:12 AM